शिवटेकडीवर शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:18 PM2019-08-05T22:18:04+5:302019-08-05T22:18:24+5:30
शहर सौंदर्याचा मानबिंदू ठरेल अशाप्रकारे शिवटेकडीचे सौंदर्यीकरण व शिवसृष्टी उभारली जाणार आहे. यासाठी चार कोटी निधी राखून ठेवला आहे. वडाळी व छत्री तलावाचे पुनरुज्जीवन सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर सौंदर्याचा मानबिंदू ठरेल अशाप्रकारे शिवटेकडीचे सौंदर्यीकरण व शिवसृष्टी उभारली जाणार आहे. यासाठी चार कोटी निधी राखून ठेवला आहे. वडाळी व छत्री तलावाचे पुनरुज्जीवन सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महापालिकेच्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यानी घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोंडे बोलत होते. महापालिकेच्या शाळांमध्ये ९५०० विद्यार्थी शिकतात. या सर्व शाळा कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत या अद्ययावत राहाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
महापालिकेचा उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. मालमत्ता करातून ३५ कोटी मिळतात; परंतु अद्यापही १५ ते २० टक्के लोक कर भरत नाहीत. त्यासाठी इतर परवानग्या देताना कर भरला किंवा कसे, हे तपासले पाहिजे.
शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत ४५०० नागरिकांना लाभ मिळाला. अशा नागरिकांना अधिवासपत्र २५ आॅगस्टला समारंभपूर्वक वितरित करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनानंतर बायोमायनिंग करून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल. त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
मोकाट गुरे आढळल्यास मालकावर गुन्हा
मोकाट गुरांमुळे शहरात लहान-मोठे अपघात होतात. या गुरांना आता पायबंद घातला जाणार आहे. ही जनावरे ज्या मालकाची असतील, त्या मालकावर एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. बडनेरा येथे अत्याधुनिक धर्तीचे फिश हब उभारले जात आहे. त्यामुळे मत्स्यबीज व्यावसायिकांना लाभ मिळेल. अमरावती शहर राहणीमान दर्जासाठी देशात सोळावे व राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ही गुणवत्ता आणखी सुधारावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले आहे.