अंबादेवी संस्थानला ‘शो-कॉज’ नोटीस
By admin | Published: December 5, 2015 12:16 AM2015-12-05T00:16:36+5:302015-12-05T00:16:36+5:30
नवरात्रोत्सवात अंबादेवी संस्थानने निमंत्रण पत्रिकांद्वारे जवळच्या लोकांनाच महाप्रसादाचा लाभ घेण्यास बोलावल्याने अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले, ....
अमरावती : नवरात्रोत्सवात अंबादेवी संस्थानने निमंत्रण पत्रिकांद्वारे जवळच्या लोकांनाच महाप्रसादाचा लाभ घेण्यास बोलावल्याने अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या धर्मदाय सहआयुक्तांनी अंबादेवी संस्थानच्या चौकशीचे निर्देश निरीक्षकांना दिले आहेत. या चौकशीत संस्थानने सहकार्य न केल्याने विश्वस्तांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे.
अंबा व एकवीरा देवीच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात संस्थानाची चौकशी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत सुरू आहे. त्यातच नवरात्रोत्सावात अंबादेवी संस्थानतर्फे पत्रिकावाटप करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पत्रिका ओळखीतील व्यक्तिनांच वितरित करून निमंत्रण देण्यात आल्याने अनेक सामान्य भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले. महाप्रसाद घेण्याकरिता गेलेल्या अनेक भाविकांना प्रवेशद्वारापासून हाकलून लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते.
विश्वस्तांना तिसऱ्यांदा तारीख
अमरावती : यासंदर्भात 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली होती. हजारो भाविकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताला समर्थन दर्शवून संस्थानाच्या कारभारावर अंकुश ठेवण्याची मागणी केली होती. ‘लोकमत’च्या या वृत्ताचे कात्रण मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. या बाबीची अमरावती विभागातील धर्मदाय सहआयुक्त ओ.पी. जयस्वाल यांनी दखल घेऊन अंबादेवी सस्थानची चौकशी सुरु केली आहे. चौकशीचे काम निरीक्षक डी.एस. नामकासे व आर.ए. गुल्हाने यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या चौकशीत संस्थानाकडून वार्षिक अहवाल व विविध प्रकारच्या २० मुद्यांवर स्पष्टीकरण मागविले आहे. मात्र, अद्याप अंबादेवी संस्थानकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य निरीक्षकांना मिळाले नसून अहवालसुध्दा देण्यात आला नाही. त्यामुळे अंबादेवी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. संस्थानातील पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी दोन वेळा तारीख देण्यात आली. मात्र, अद्याप विश्वस्तांपैकी कोणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे आता संस्थानच्या विश्वस्तांना तिसऱ्यांदा तारीख देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.