धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: April 27, 2023 05:11 PM2023-04-27T17:11:42+5:302023-04-27T17:14:18+5:30
मुलगी केवळ १३ वर्षांची : मुलगाही अल्पवयीन, मावशीही आरोपी
अमरावती : लैंगिक अत्याचार करण्याच्या कुहेतूने एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. तब्बल दीड दिवस तिला एका महिलेच्या फ्लॅटमध्ये डांबण्यात आले. २४ एप्रिल रोजी दुपारी २.३४ ते २६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह त्याचा मित्र व त्या अल्पवयीन मुलाच्या मावशीविरुद्ध विनयभंग, अपहरण, गुन्ह्यासाठी प्रेरित करणे व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २६ एप्रिल रोजी पहाटे १.३६ च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद घेतली.
तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगा व पीडित मुलगी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांचे एकमेकांशी बोलणेदेखील सुरू असायचे. २४ एप्रिल रोजी दुपारी २.३० च्या सुमारास त्या ओळखीतील अल्पवयीन मुलाने त्याच्या एका मित्राच्या मदतीने तिचे अपहरण केले. ते तिला दुचाकीवर बसवून त्यांच्या मावशीच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तेथे त्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत तिच्याशी गैरकृत्य केले. तिचा विनयभंग केला.
ती रात्रभर रडत राहिली
अकस्मात झालेले अपहरण व त्यानंतर फ्लॅटमधील गैरकृत्याच्या प्रयत्नामुळे ती १३ वर्षीय मुलगी नखशिखांत हादरली. तिने रडून अख्खा फ्लॅट डोक्यावर घेतला. मात्र, २४ ची संपूर्ण रात्र तिला त्याच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. वारंवार घरी सोडून देण्याची तिची विनंती धुडकावून लावण्यात आली, तर २५ ची सकाळ उजाडताच तिला ऑटोरिक्षासाठी पैसे देऊन तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.
दिवसरात्र शोधाशोध
मुलगी रात्र झाल्यानंतरही घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांची तगमग वाढली. शेजाऱ्यांसह तिच्या मैत्रिणी व नातलगांकडे विचारणा झाली. मात्र, तिचा शोध न लागल्याने पोलिसांतदेखील खबर देण्यात आली. २५ ला ती घरी पोहोचताच तिच्यावर तू रात्रभर कुठे होतीस, काय केले, अशा नानाविध प्रश्नांची सरबत्ती झाली. अखेर पालकांकडून धीर मिळाल्यानंतर तिने आपबीती कथन केली. धक्क्यातून सावरल्यानंतर तिच्या कुटंबीयांनी तिला घेऊन गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले तथा तक्रार नोंदविली.