धक्कादायक! धामणगाव तालुक्यातील २० गावांना दूषित पाण्याचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:18+5:302021-07-20T04:11:18+5:30
मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : पावसाळ्यात प्रत्येक ग्रामस्थाला स्वच्छ पाणी देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ...
मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : पावसाळ्यात प्रत्येक ग्रामस्थाला स्वच्छ पाणी देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे तब्बल २० गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या गावातील पाण्याचे नमुने दूषित आल्याने आता उच्चस्तरावरून चौकशी होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी तालुकास्तरावर आढावा घेत ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर ग्रामपंचायतींनी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे पाहायला मिळत आहे .
या गावातील पाणी नमुने आले दूषित
निंबोली परिसरातील भातकुली रेणुकापूर, बोरवघड, बोरगाव धांदे, रायपूर कासारखेड, गिरोली, विटाळा ,उसळगव्हाण, हिगणगाव, मलातपूर, वाढोणा यांसह अजनसिंगी, मंगरूळ दस्तगिर परिरातील अशा तब्बल २० गावांतील पाणी नमुने दूषित आले आहेत.
ग्रामपंचायत रेकार्डच्या नावावर लावतात बनावट बिले
धामणगाव तालुक्यात पेपरलेस ग्रामपंचायतींवर अद्यापही भर दिला जात नाही. चांदूर रेल्वे, अमरावती येथून चढ्या भावाने ग्रामपंचायतीला लागणारे रेकार्ड खरेदी केले जाते. यातच ब्लिचिंग पावडर खरेदी केल्याचे बिल लावण्यात येतात. मात्र, अशा पिशव्या मुळात आणल्या जात नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. थोड्या कमिशनसाठी काही ग्रामसेवक ग्रामस्थांच्या जिवाशी खेळतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी दूषित पाणी नमुन्यांवरून काही जागरूक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.
लोकप्रतिनिधी राहावे जागरूक
गावातील पाण्याची टाकी स्वच्छ आहेत का? पाणीपुरवठा कर्मचारी दररोज आरोग्य विभागाच्या निर्देशांप्रमाणे ब्लिचिंगचा वापर करतो का? ब्लिचिंग खरेदी करताना रेकार्ड खरेदीची बिले लावली जातात का? ग्रामसेवक ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करतात का? अशा प्रश्नांविषयी सरपंच, उपसरपंच यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
--------------------
पावसाळ्याच्या दिवसांत तथा वर्षभर ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयाेग करणे आवश्यक असते. मात्र, जे ब्लिचिंगचा वापर करीत नाहीत, अशा ग्रामसेवकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- सुनील शिसोदे, माजी उपसभापती, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे
---------------
धामणगाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंगचा योग्य वापर होत नाही, त्यांची चौकशी करून अशा ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल.
- माया वानखडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे