आता घरी काय सांगायचे.. ! मग अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हपायी त्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:03 AM2020-07-10T10:03:23+5:302020-07-10T10:07:51+5:30
एका मुलीला दिलेला पेन ड्राइव्ह तिने परत न दिल्याने तणावाखाली आलेल्या तरुणाने अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हसाठी आपला जीव दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: एका मुलीला दिलेला पेन ड्राइव्ह तिने परत न दिल्याने तणावाखाली आलेल्या तरुणाने अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हसाठी आपला जीव दिला. सतरा वर्षांच्या राजने (बदललेले नाव) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मधील मजकूर आतून समोर आली. याप्रकरणी मृताच्या आई-वडिलांचेही लवकरच बयाण नोंदवले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. राजने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळावरून बुधवारी जप्त केली. त्यात इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीतून मजकूर लिहिला होता.
सुसाईड नोट मधील मजकूर अनुसार राजने एका मुलीला काही महिन्यांपूर्वी पेन ड्राइव दिला होता. तो पेन ड्राईव्ह त्या मुलीला त्याने परत मागितला. तिने तो पर्यंत दिला नाही. राजुने परत करण्याचा खूप आग्रह धरल्यावर तिने पेन ड्राइव हरवल्याचे त्याला सांगितले. या कारणामुळे राज त्रस्त झाला होता. आता घरी काय सांगावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्याने पेन ड्राईव्ह परत करण्याचा हट्ट धरल्यामुळे त्या मुलीच्या भावाने राजूला फोन करून पेन ड्राईव्ह परत मागू नको, परत फोन करू नको आता दमवजा धमकी दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मुलीच्या भावाने आठ वेळा फोन करून पेन ड्राईव्ह मागू नको म्हणून धमकावले.
गळफास देण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याचा फोन आल्याचा उल्लेख त्या नोटमध्ये आहे. या कारणामुळे राज कमालीचा तणाव ग्रस्त झाला होता. इतर कोणाचाही त्रास नसल्याचे त्याने आपल्या मृत्यूपूर्व पत्रात लिहून ठेवले आहे. मुलीने हरवलेल्या पेन ड्राईव्हमध्ये काही गूढ आहे का या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांना घटनास्थळावर राजस्थान मोबाईल आढळून आला नाही. त्याला आत्महत्येपूर्वी कुणाचे कॉल आले ते शोधण्याकरता पोलीस मोबाईलचा शोध घेत आहेत. आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांचे बयाण नोंदविले जाईल असेही पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.