एम.कॉम.प्रथम वर्षाला मराठीऐवजी इंग्रजीत पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:55 PM2019-05-15T17:55:07+5:302019-05-15T17:56:05+5:30
अमरावती विद्यापीठाचा प्रताप : पेपर न सोडविता विद्यार्थ्यांची विद्यापीठात धाव
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत एम.कॉम. प्रथम वर्षाचा द्वितीय सेमिस्टर 'व्यवसायिक संगणक' या विषयाचा पेपर चक्क मराठीऐवजी इंग्रजीत देण्यात आल्याचा धक्कदायक प्रकार बुधवारी निदर्शनास आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर न सोडविता विद्यापीठ गाठले. मात्र, येथे त्वरेने कोणताही तोडगा निघाला नाही. आता हा विषय केंद्रीय मूल्यांकन समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेत एम.कॉम. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टरचा व्यवसायिक संगणक विषयाचा पेपर बुधवारी सकाळी ९ ते १२ या कालावधीत होता. एम.कॉम. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नपत्रिका देण्यात आल्यात. त्यामुळे एकूणच विद्यार्थी गोंधळून गेले. मराठी भाषेचे विद्यार्थी इंग्रजीचा कसा पेपर सोडविणार, असा सवाल परीक्षार्थ्यांनी केला. मात्र, केंद्रावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर विद्याभारती महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, विमलाबाई देशमुख महाविद्यालय आणि तक्षशीला महाविद्यालयातील विद्यार्थी एकवटले. विद्यापीठ गाठून त्यांनी परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्यासमोर आपबिती कथन केली.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नान्वये सिलॅबसनुसार एम.कॉम. प्रथम वर्षाचा व्यवसायिक संगणक विषयाचा पेपर देण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांनी त्यांच्या (मराठी, हिंदी अथवा इंग्रजी) भाषेत सोडविणे अपेक्षित आहे, असे हेमंत देशमुख यांनी सन २०१६ पासून बदल झालेल्या सिलॅबसची प्रत विद्यार्थ्यांना दाखविली.
सिलॅबसमध्ये झालेल्या बदलाची माहिती संबंधित विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे, असेदेखील परीक्षा संचालक देशमुख म्हणाले. मात्र, या क्षणी विद्यापीठ कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना मराठीऐवजी इंग्रजी भाषेत देण्यात आलेल्या पेपरसंदर्भात केंद्रीय मूल्यांकन समितीची बैठक २० मे रोजी घेण्याबाबत निर्णय झाला. परंतु, चूक कुणाचीही असली तरी आजमितीला विद्यार्थीच भरडला जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. यावेळी अर्जुन अंभोरे, अक्षय वाघमारे, रोहित गजभिये, मनीषा तांबडे, भावना मासोदकर, बुद्धिमान बनसोड, मोहिनी कंगाले आदी विद्यार्थी उपस्थित होते.
नव्या सिलॅबसप्रमाणे पेपर इंग्रजीत असला तरी परीक्षार्थ्यांना त्यांच्याच भाषेत सोडवायचा होता. एम.कॉम. प्रथम वर्ष व्यवसायिक संगणक विषयाबाबत हा वाद आहे. आता यासंदर्भात २० मे रोजी केंद्रीय मूल्यांकन समितीची बैठक होणार असून, हीच समिती अंतिम निर्णय घेईल.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.
मराठी भाषेचा पेपर न देता तो इंग्रजीत होता. त्यामुळे परीक्षा केंद्रावर स्वाक्षरी करून बाहेर पडलो. एम.कॉम. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टरचा व्यवसायीक संगणक विषयासाठी हा प्रकार सर्वत्र अशाच घडला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी मराठी भाषेच्या पेपरची मागणी केली आहे. यापूर्वी मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका देण्यात आल्यात.
- अर्जुन अंभोरे
विद्यार्थी, श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती