धक्कादायक, तिवस्यात ३६५ नागरिकांच्या घरी डास अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:12+5:302021-08-29T04:15:12+5:30
फोटो - दहाट २८ ओ ७६ रुग्ण आढळले तापाचे, आरोग्य विभाग व नगरपंचायतीचे सर्वेक्षण सूरज दाहाट - तिवसा : ...
फोटो - दहाट २८ ओ
७६ रुग्ण आढळले तापाचे, आरोग्य विभाग व नगरपंचायतीचे सर्वेक्षण
सूरज दाहाट - तिवसा : शहरात डेंग्यूसदृश आजाराने चौघांचा बळी गेला, तर अनेक रुग्णांना लागण झाल्याने तिवसा नगरपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी आरोग्य तपासणी व साफसफाईची पाहणी सुरू आहे. यात १५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात धक्कादायक म्हणजे, ३६५ नागरिकांच्या घरात, परिसरात, स्वयंपाकघरात डासांच्या अळ्या आढळून आल्या. तब्बल ७६ जणांना ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.
तिवसा शहरातील नागरिक दीड महिन्यांपासून तापाने फनफनत आहेत. या कालावधीत ३० ते ४० जणांना डेंग्यूसदृश आजार झाला, तर दीड महिन्यात चार जणांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने स्वच्छतेचा मुद्दा तापला होता. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांनी नियोजन करीत घरोघरी सर्वेक्षण सुरू केले. यात गल्लोगल्लीची पाहणी व घरोघरी जाऊन प्रत्येकाचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. यात घराच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या टायरमध्येच नव्हे, तर चक्क स्वयंपाकघरात तसेच फ्रीजमध्येही आजाराला आमंत्रण मिळेल, अशा अळ्या या सर्वेक्षणात दिसून आल्या. त्या तातडीने नष्ट करून ब्लिचिंग पावडरने सफाई करण्यात आली. घर तसेच परिसरात स्वछता ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या. शहरात आता चांगल्या पद्धतीने स्वच्छता व फवारणी करीत आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
------------
रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला
१५०० घरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७५ रुग्ण तापाचे आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. घरोघरी डेंग्यूला आमंत्रण देणाऱ्या अळ्या तातडीने नष्ट केल्याने तिवसेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------------
नगरपंचायत क्षेत्रात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये शहरात धूरळणी, फवारणी, नाले सफाई, गवत कापणे तसेच इतर सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा.
-आकाश सोनेकर, स्वच्छता निरीक्षक