धक्कादायक! रुग्णाच्या डोळे, पाय, गुप्तांगाला लाल मुंग्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 04:50 PM2021-12-02T16:50:21+5:302021-12-02T17:10:18+5:30
साठवणे यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना सोमवारी डॉ. पंजाबराव देशातील स्मृती वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आज सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेत जीवघेणा हल्ला केला.
अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अर्धांगवायूच्या आजारावर एमआयसीयू विभागात उपचार घेणाऱ्या एका ७१ वर्षीय रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांवर मुंग्यांनी चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विष्णुपंत साठवणे असे या ७१ वर्षीय रुग्णांचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, साठवणे यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. अशातच बुधवार, १ डिसेंबर रोजी त्यांना सायंकाळी उपचारासाठी डॉ. पंजाबराव देशातील स्मृती वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान गुरुवार, २ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेत जीवघेणा हल्ला केला. यात विष्णुपंत साठवणे यांच्या एका डोळ्याखाली, गुप्तांग तसेच शरीरावर मोठ्या जखमा झाल्या आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता रुग्णाच्या नातेवाइकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ते अचंबित झाले. त्यानंतर एका कापडाने त्या सर्व मुंग्या पुसून काढल्या. दरम्यान, या संपूर्ण घटनेने मात्र पीडीएमसीमधील आरोग्य यंत्रणा किती बेफिकीर आहे हे वास्तव समोर आले आहे.
पीडीएमसीत उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर आशेचा किरण घेऊन येतात. मात्र येथे मिळणारी वागणूक, व्यवस्था मात्र अतिशय भयंकर आहे. यापूर्वीही या रुग्णालयात चार चिमुकल्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा चक्क जिवंत रुग्णावर मुंग्या हल्ला करत असताना डॉक्टर आणि नर्स काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी वार्डातील नर्सला शोकॉज नोटीस दिली असून, रुग्णास मधुमेहाचा आजार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नर्स, सुरक्षा रक्षकांची अरेरावी
झालेल्या प्रकारासंदर्भात रुग्णांच्या नातेवाइकांनी वार्डातील नर्सला विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. तसेच झालेल्या प्रकाराचे चित्रीकरण करत असताना सुरक्षा रक्षकाने धमकावल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.
७० वर्षीय विष्णुपंत साठवणे यांना बुधवार, १ डिसेंबर रोजी एमआयसीयूमध्ये डायबेटिसच्या उपचारार्थ भरती करण्यात आले. अशा रुग्णांना मुंग्या लागू शकतात. त्यांनाही तसे झाले. गुरुवारी त्यांच्या नातेवाइकांनी येथून डिस्चार्ज घेऊन पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले आहे.
- अनिल देशमुख, अधिष्ठाता, पीडीएमसी