धक्कादायक! गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:49+5:302021-09-25T04:12:49+5:30
(सुधारित बातमी) अमरावती/ संदीप मानकर खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपाचा पुनर्वापर मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र, पैसे वाचविण्यासाठी ...
(सुधारित बातमी)
अमरावती/ संदीप मानकर
खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपाचा पुनर्वापर मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र, पैसे वाचविण्यासाठी व्यापारी गंजलेल्या जुन्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हा प्रकार मानवी आरोग्यासाठी हानिकारक असून, अशा विक्रेत्यांवर धाड टाकून अन्न व प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. किराणा व्यावसायिक खुल्या बाजारात एक वेळा वापरलेले तेलाचे डबे (पिंप) रिकामे करून, तसेच ते एकत्र गोळा करून येथील इतवारा बाजारात त्याची विक्री केली जाते. येथून मसानगंज नागोबा मंदिर परिसरात असलेले किरकोळ व्यावसायिक असे पिंप विकत घेतात. त्यानंतर गोळा केलेले पिंप मसानगंज परिसरात आणून ते वॉश केले जातात. काही पिंप गंजलेले असतात. ते सुद्धा या ठिकाणी वॉश केले जातात. काही वेळेस तर अस्वच्छ डबेसुद्धा तसेच पुन्हा किरकोळ किराणा व्यावसायिक, तेलाचे पॅकेजिंग करणाऱ्यास विकले जातात. त्यानंतर त्यात पुन्हा खाद्यतेल भरून नागरिकांना विक्री केले जात असल्याचे वास्तव आहे. वापरलेल्या गंजलेल्या तेलाच्या पिंपाचा पुनर्वापर करणे हा सुद्धा अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा ठरतो. मात्र, हा प्रकार शहरातील काही भागांत सर्रास सुरू असल्याने पोलीस व एफडीएने संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे.
बॉक्स :
१० रुपयाला खरेदी; ३० रुपयाला पुन्हा विक्री
गंजलेल्या पिंपाचासुद्धा शहरात पुनर्वापर केला जात आहे. वापरलेले तेलाचे पिंप व्यावसायिकांकडून किरकोळ व्यावसायिक १० रुपये प्रतिडबा खरेदी करतात. त्यानंतर ते डबे मसानगंज परिसरात आणले जातात. येथे काही दिवस हे डबे तसेच ठेवल्यानंतर डिटर्जंट पावडरमध्ये टाकून वॉश केले जातात. त्यानंतर ते डबे पुन्हा काही व्यावसायिकांना ३० रुपये डब्याप्रमाणे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. एमआयडीसीतील तेल कंपन्यासुद्धा असे पिंप खरेदी करून त्याचा पुनर्वापर करीत असल्याची माहिती आहे.
कोट
अस्वच्छ डब्यात पुन्हा खाद्यतेल भरून विक्री केली आणि ते तेल खाण्यात आले तर बुरशीजन्य आजार(फंगस) होऊ शकतात, तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शन व टायफाॅइडसुद्धा होण्याची शक्यता असते.
डॉ. विक्रम कोकाटे, किडनी तज्ज्ञ, अमरावती