धक्कादायक; गुण कमी दिल्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकले, विद्यार्थ्यावर हाफमर्डरचा गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: November 8, 2023 12:57 PM2023-11-08T12:57:01+5:302023-11-08T12:57:41+5:30

प्राणघातक हल्ला : कॉलेज रोडवर विद्यार्थ्याचा धिंगाणा

Shocking; student stabbed the professor with knife after giving him less marks | धक्कादायक; गुण कमी दिल्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकले, विद्यार्थ्यावर हाफमर्डरचा गुन्हा

धक्कादायक; गुण कमी दिल्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकले, विद्यार्थ्यावर हाफमर्डरचा गुन्हा

अमरावती : परिक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेऊन एका विद्याथ्याने चक्क प्राध्यापकाला चाकुने भोसकले. या घटनेत ते ३० वर्षीय प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. चैतन्य अरविंद गुल्हाने (३०, रा. महालक्ष्मीनगर) असे मृत्यूशी झुंज देत असलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

याप्रकरणी, अमर सभादिंडे (३०, महादेवखोरी) या सहकारी प्राध्यापकाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री आरोपी विद्यार्थी अर्पित जयवंत देशमुख (२१, रा. सातेगाव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेपासून आरोपी अर्पित फरार झाला आहे.

चैतन्य गुल्हाने हे मार्डी रोडस्थित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी या महाविद्यालयात प्राध्यापक असून, ते ॲनालिसीस हा विषय शिकवतात. तर अर्पित देशमुख हा त्याच कॉलेजमध्ये बी फॉर्मसीच्या अंतिम वर्षाला आहे. अर्पितला कमी गुण मिळाले म्हणून त्याने आपल्या पोटात चाकूने वार केले, असे गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, गुल्हाने यांच्या पोटातील छोट्या व मोठ्या आतडीला गंभीर मार लागल्याने त्यांना खोलवर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

अशी उघड झाली घटना

गोडे कॉलेजमधील शिक्षक अमर सभादिंडे हे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घराकडे निघाले असता त्यांना अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलजवळ गर्दी दिसली. त्यांनी त्या गर्दीत जाऊन पाहिले असता त्यांना चैतन्य गुल्हाने हे रक्तबंबाळ स्थितीत दिसून आले. आपल्याला अर्पितने पोटात चाकू मारल्याची बाब त्यांनी सभादिंडे यांना सांगितली. त्याचवेळी गुल्हाने यांनी आपल्यावरील हल्ल्याची माहिती मामाला देखील दिली. दुसरीकडे सभादिंडे हे गुल्हाने यांना दुचाकीवर बसवून गोडे कॉलेजला घेऊन गेले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अमरावती येथील खासगी रूग्णालयात हुलविण्यात आले.

गंभीर जखमी असलेल्या गुल्हाने यांच्या सहकाऱ्याच्या तक्रारीवरून अर्पित देशमुखविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

- गोरखनाथ जाधव, ठाणेदार, फ्रेजरपुरा

Web Title: Shocking; student stabbed the professor with knife after giving him less marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.