२२ कोटींच्या बागलिंगा प्रकल्पात 'रात का है खेल सारा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:23 PM2023-02-01T15:23:10+5:302023-02-01T15:26:53+5:30
मुरूम सोडून दगड धोंडे, काळी सोडून लाल मातीचा भरणा
चिखलदरा (अमरावती) :अमरावती मध्यम पाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यातील बागलिंगा येथे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या २२ कोटी रुपयांच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप सरपंच, गावकरी व दस्तुरखुद्द येथे काम करणाऱ्या ट्रक चालकांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अभियंता कंत्राटदाराच्या संगनमताने आमच्या गावांना धोका असल्याचा त्यांचा आरोप आहे.
चिखलदरा शहरासह आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्यासह ओलितासाठी २२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या बागलिंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार बागलिंगा येथील सरपंच निर्मला दिलीप धांडेकर, चालक गोपाल चव्हाणसह गावकऱ्यांनी केली आहे, तरी यापूर्वी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीसुद्धा लिखित तक्रार केल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर संपूर्ण कामाची देयके थांबवून कामाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रात्रीत चालतो सर्व खेळ
प्रकल्पासाठी आवश्यक असलेले मुरूम आणि काळी माती दिवसा करजगाव येथून तर रात्रीला नदीच्या शेतामधून आणून टाकली जाते. मुरमाऐवजी मोठे दगड, तर काळ्या मातीऐवजी लाल माती टाकून रात्रीतूनच प्रकल्पाच्या कामाची उभारणी केली जात आहे. तर पाणी टाकून दबाई न करता तसेच काम सुरू असल्याचा आरोप कामावरील खासगी ट्रक चालक गोपाल चव्हाण यांनी केला आहे.
प्रकल्पाचे निकृष्ट काम, फुटण्याची भीती?
२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम कोरोना काळानंतर मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. संबंधित काम निकृष्ट झाल्यास होण्यापूर्वीच पाणी भरल्यानंतर फुटण्याची भीती या आदिवासी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे, तर अधिकाऱ्यांना सांगूनही काहीच उपयोग नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला असून, कंत्राटदार व संबंधित दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणणे आहे.
२२ कोटींचे काम १६ टक्के कमी दराने?
बागलिंगा प्रकल्पाचे काम वैष्णवी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी घेतले असून, १६ टक्के कमी दराने घेण्यात आल्याची माहिती आहे, त्यामुळे पैसे वाचविण्याच्या नादात प्रकल्पाची वाट लावल्या जात आहे का? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.