जेरबंद करता येत नसेल तर ‘शूट’ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:23 AM2018-10-26T01:23:49+5:302018-10-26T01:24:23+5:30
नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.
तिवसा तालुक्यात प्रचंड दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. याच मार्गाने शेकडो पालख्या व हजारो नागरिक राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला जाणार आहेत. त्यामुळे ‘त्या’ नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारण्याचे आदेश द्या, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सकाळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली.
गुरुवारी पहाटे या वाघाने रघुनाथपूर येथील प्रभाकर वानखडे या शेतकऱ्याचे वासरू ठार केल्याची बाब कळताच आ. यशोमती ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. चार दिवसांवर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील मौन श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर लाखो नागरिकांचा वावर या ठिकाणी राहणार असल्याने त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. यवतमाळ येथे १३ नागरिकांना ठार केल्यानंतर त्या वाघिणीला मारण्याचे आदेश देण्यात आले. येथेही शासनाला १३ नागरिकांचे बळींची प्रतीक्षा आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी वनमंत्र्यांकडे केला. या वाघाने पाच दिवसांत दोन नागरिक, गाय, म्हैस, वासरांना ठार केले. यामुळे कुºहा, तिवसा, वºहा, मोझरी, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, माळेगाव, घोटा, अंजनसिंगी परिसरात प्रचंड दहशत आहे. वाघाच्या भीतीने नागरिक शेतात जायची हिंमत करीत नसल्याने पिकेदेखील धोक्यात आलेली आहेत. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा आ. ठाकूर यांनी दिला.
कायदा हाती घेतल्यास शासन जबाबदार
आठ दिवसांपासून नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांचे जीव जाताहेत. तिवसा तालुक्यात प्रचंड दहशत आहे. या पार्श्वभूमीवर आ. यशोमती ठाकूर यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. मिश्रा व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशीदेखील संवाद साधला. वाघाला त्वरित जेरबंद करा अथवा ठार तरी करा, अन्यथा नागरिकांनी कायदा घेतल्यास ही जबाबदारी शासनाची राहील, अशा इशारा आ. यशोमती ठाकूर यांनी दिला.