‘ट्रायबल’मध्ये २७० कोटींच्या फर्निचरची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:53 PM2019-01-03T16:53:17+5:302019-01-03T16:53:31+5:30
शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांचा कायापालट : केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून पुरवठ्याचा निर्णय
- गणेश वासनिक
अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा, वसतिगृहांचे कायापालट अभियान हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांना लागणाºया आवश्यक त्या पायाभूत सोयी, सुविधांची पूर्तता केली जाणार आहे. त्याअनुषंगाने शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांकरिता २७० कोटी रूपयांचे विविध साहित्य केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘ट्रायबल’मध्ये आतापर्यंत एकाचवेळी पुरवठा करणारा हा सर्वात मोठा निर्णय ठरला आहे.
‘ट्रायबल’च्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या कल्पकतेतून आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘कायापालट’ करण्याच्या अनुषंगाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी राज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा आणि ४९१ वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण झाले. नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सोईसुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य पुरवठा करण्याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी गत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. आश्रमशाळा, वसतिगृहांसाठी एकूण १८ प्रकारचे साहित्य, वस्तू खरेदी केली जाणार आहे. पुरवठ्याची प्रक्रिया ई-निविदेद्वारे होणार असून, जेम पोटर्लवरून अटी, शर्तीनुसार ते खरेदी होणार आहे. पुरवठादाराने यापूर्वी शासकीय साहित्य पुरवठ्याचा तीन वर्षांचा केलेला असावा. १५ कोटींच्या पुरवठ्याचा अनुभव अनिवार्य केला आहे. आता आश्रमशाळा, वसतिगृहात कोणताही विद्यार्थी जमिनीवर अंथरूण टाकून झोपणार नाही, अशी नव्या प्रणालीत व्यवस्था करण्यात आली आहे.
शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये फर्निचर, शैक्षणिक साहित्य हे फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत पोहचणार अशी यंत्रणा उभारली आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ते वाटप केले जाईल. एकाचवेळी ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे.
- किरण कुलकर्णी,
आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक
चारही एटीसींकडून साहित्य, फर्निचरची मागणी
नागपूर, ठाणे, नाशिक व अमरावती अपर आयुक्तांनी आश्रमशाळा, वसतिगृहांना लागणारे साहित्य, फर्निचरची मागणी नोंदविली आहे. त्याअनुषंगाने यादी तयार करण्यात आली आहे. यात सिंग्नल बेड, बेंचेस बेड, बंक बेड, कपबोर्ड, डायनिंग टेलब अटॅच सीट, लॉकर्स, लहान बेंच, फ्लॅप चेअर्स, स्टॉप रूम टेबल, टिचर्स चेअर्स, टिचर्स टेबल, संगणक टेबल, एक्झिकेटिव्ह डायनिंग टेबल स्वतंत्र, स्डटी चेअर्स, स्डटी टेबल, कॉम्युटर टेबल, कपबोर्ड होस्टेल, एक्सुकेटिव्ह डायनिंग चेअर्स असे एकुण ५६०, ६९४, ४६१, ४४ एवढ्या संख्येने खरेदी होणार आहे. त्याकरिता सुमारे २७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.