दुकाने, हॉटेल सुरू झाली; मंदिरे कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:10+5:302021-08-22T04:16:10+5:30
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादलेले बहुतांशी निर्बंध राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून शिथिल केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल, दुकाने, ...
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादलेले बहुतांशी निर्बंध राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून शिथिल केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल, दुकाने, बार सर्वांनाच रात्री १० वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये आता गर्दी वाढू लागली आहे. सर्व सुरू असताना केवळ मंदिर बंद का? श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे. किमान आता तरी मंदिरे उघडी करा, अशी मागणी भाविकांमधून जोर धरत आहे. कोरोनाचे नियम पाळून मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरू करणे शक्य नसून शासन यावर कधी निर्णय घेणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन केले होते. मे, जून पासून हळूहळू त्यात शिथिलता आणण्यास सुरुवात केली. जसा कोरानाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. तसतसे शासनाने नियम आणखी शिथिल केले. १५ ऑगस्टपासून राज्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, अद्याप तरी सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. श्रावण महिना व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात सण-समारंभाची रेलचेल असते. श्रावण सोमवार व शनिवारी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते. परंतु सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे भाविकांच्या नित्यनेमात खंड पडला आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे. मंदिरात केवळ पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा होत आहे. मात्र, सर्वच कार्यक्रम सध्या तरी ठप्पच आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे किमान आतातरी मंदिरे उभी करावीत भाविकांकडून जोर धरत आहे.
बॉक्स
आर्थिक उलाढाल ठप्प
मंदिरांवर अनेकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. फुले, फळे व इतर धार्मिक विधीसाठी साहित्य विकणारी दुकानदार या सर्वांचा व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.