शॉर्ट सर्किट : २२ नवजात हलविले, एक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:42 PM2019-04-22T22:42:57+5:302019-04-22T22:43:43+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) शॉर्ट सर्किट झाल्यानंतर दाटलेल्या धुरामुळे जणू गॅस चेम्बरचीच निर्मिती झाली. उपचारार्थ दाखल असलेल्या त्या कक्षातील २२ नवजातांचे धोक्यात आले. समयसुचकता साधून डाक्टर्स आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांनी सर्व २२ नवजात बालकांना तातडीने इतरत्र हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Short circuit: 22 newborns moved, one rump | शॉर्ट सर्किट : २२ नवजात हलविले, एक दगावले

शॉर्ट सर्किट : २२ नवजात हलविले, एक दगावले

Next
ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालय : चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागात दाटला धूर; डॉक्टर्स, नातेवाईकांमध्ये घबराट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) शॉर्ट सर्किट झाल्यानंतर दाटलेल्या धुरामुळे जणू गॅस चेम्बरचीच निर्मिती झाली. उपचारार्थ दाखल असलेल्या त्या कक्षातील २२ नवजातांचे धोक्यात आले. समयसुचकता साधून डाक्टर्स आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांनी सर्व २२ नवजात बालकांना तातडीने इतरत्र हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान दुपारनंतर त्यातील एका नवजाताची अतिविशेषोपचार रुग्णालयात प्राणज्योत मालवली. हा मृत्यू इतर कारणाने असल्याचे सांगितले जात असले तरी तो धुरानेच झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून सत्यशोधन केले जाईल काय, असा सवाल उपस्थित होतो.
काय घडले, कसे घडले?
जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी सकाळी १०.३० अतिदक्षता कक्षात (एनआयसीयू) डॉक्टरांचा राऊंड सुरू असताना बाळांचे वजन करण्याकरिता वजन मशिन चार्जर लावण्यात आले. त्यानंतर स्पार्किंग सुरू झाले. कक्षातील वीज बटनांच्या बोर्डांमध्ये लहान स्फोट होऊ लागले. वायरींग जळाल्याने उग्र वास अन् धुराचे लोळ उठले. आगीचे लोळही उठू लागले. हे बघून उपस्थितांची भंबेरी उडाली. एनआयसीयूमधील २२ बाळांचा जीव वाचविण्याकरिता रुग्ण सैरावैरा पळू लागले. राऊंडवर असलेल्या डॉक्टरांनी सिस्टर्स व आयांच्या मदतीने बाळ हलविण्याचा निर्णय घेतला. बघता-बघता सर्व २२ नवजात सुरक्षित स्थळी हलविले गेले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्णयानुसार एनआयसीयूची सोय असलेल्या इतर रुग्णालयांत सदर नवजात हलविले गेले. अतिविशेषोपचार रुग्णालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील एनआयसीयूमध्ये नवजातांना नेले गेले. घटनेनंतर अनेक तासांपर्यंत तेथे उग्र वास येतच राहिला. वायरींगची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, यापुढेही अशा घटना घडू नयेत, यासाठी येथे इलेक्ट्रिक आॅडिट करून द्यावे, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर रूम करावी, इमर्जंसी एक्झिस्टची सोय करावी, अशी मागणी तेथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पाच नवजात बालकांना पिडीएमसीत आणले गेले.दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.इतर तिघांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे, असे पिडीएमसीचे डिन डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी सांगितले.

लेबर रुम तातडीने
केली रिकामी
वायरींग जळाल्याने धूर व उग्र वासाच्या तावडीतून बाळांना वाचविण्याकरिता तत्क्षण हलविल्यानंतर त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न पडताच बाह्यरुग्ण परिचारिका ललिता अटाळकर यांनी लेबर रूम खाली करवून घेतली. काही मिनिटांकरिता नवजातांना तेथे ठेवण्यात आले.
दोन चिमुकले पीडीएमसीत
जिल्हा स्त्री रुग्णालयात दोन युनिट आहेत. इन बॉर्न म्हणजे रुग्णालयात जन्मलेले अत्यवस्थ बाळ १५ व आऊट बॉर्न म्हणजे बाहेर जन्म होऊन अत्यवस्थ असलेले बाळ ७ अशा एकूण २२ बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. घटनेनंतर चार बाळांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात, २ डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच काहींना सुटी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक संजय वारे यांनी दिली.
सुपर स्पेशालिटीत एकाचा मृत्यू
घटनेनंतर त्या २२ बाळापैकी ४ बाळांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील सविता सुभाष इंगळे (३५, रा. हिरपूर, ता. मूर्तिजापूर जि. अकोला) यांचे बाळ सोमवारी २ च्या सुमारास दगावले. तिघांची प्रकृती बरी असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
प्रसूतीनंतर ‘म्युकोनियम अस्पिरिएशन सिंड्रॉम’ कसे?
सविता इंगळे यांचे १७ एप्रिल रोजी सिझेरियन झाले. बाळाची गर्भात वाढ न झाल्याने वजन कमी, तर पोटात असताना शी केल्याने 'म्युकोनियम अस्पिरिएशन सिंड्रॉम' (संसर्गाचा एक प्रकार) झाल्याचे डॉ. चेतन मुनोत यांचे म्हणणे आहे. प्रसूतीनंतर पाच दिवसांपर्यंत नवजाताला काहीही झाले नाही. अचानक घटनेनंतरच अघटित घडले. त्यामुळे खरे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असे झाले शॉर्टसर्किट
डफरीन रुग्णालयात कमी वजनाच्या बाळांना योग्य उपचार होण्याकरिता एनआयसीयू युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील विद्युत व्यवस्था मेंटेनन्स होण्याकरिता विविध मशिनरीज बसविल्या आहेत. त्यामध्ये असलेले आयसोलेटर बॉक्सवर विजेचा दाब वाढल्याने तो जळाला. त्याची वायरींग एकमेकांना स्पर्श होऊन स्फोट व आगीचे लोळ उडाले. पॉवर अधिक असल्याने वायरींगदेखील जळाल्या. त्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात पसरले, अशी माहिती तेथील टेक्निशियन सुधीर शेंडे यांनी दिली.

नवजातांना दोन ठिकाणी हलविले. त्या केअर युनिटची तात्पुरती दुरुस्ती करून पूर्ववत केले जाईल. पुढे अशा घटना टाळण्याच्या दृष्टीने परिसरातील रिकाम्या जागेत स्वतंत्र इलेक्ट्रिक पॅनेल बसविण्याची व्यवस्था करू.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Short circuit: 22 newborns moved, one rump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.