'इर्विन'मध्ये औषधांचा तुटवडा, पाच महिन्यांपासून पुरवठा नाही; शासनाकडून औषधी केव्हा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 02:08 PM2022-12-27T14:08:02+5:302022-12-27T14:08:58+5:30
महिन्याला लागतात ६ कोटींची औषधी
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) तर्फे वर्ष २०२२-२३ या वर्षामध्ये जिल्ह्याला लागणाऱ्या सर्वच प्रकारच्या औषधांची मागणी शासनाकडे केलेली आहे. परंतु पाच महिन्यांनंतरही हापकिनकडून रुग्णालयाला औषधी प्राप्त झालेली नाही. जिल्ह्यात दर महिन्याला ६ ते ७ कोटी रुपयांची औषधी लागते. औषधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी डीपीडीसीच्या पुडातून दोन कोटी रुपयांची औषधी रुग्णालय प्रशासनाने खरेदी केली आहेत. परंतु शासनाकडून औषधी केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात सध्या सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधसाठ्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यांपासून शासनाकडून रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. इर्विन रुग्णालय येथील औषध भंडार मधूनच जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांना औषधसाठ्यांचा पुरवठा केला जातो. परंतु मागील पाच महिन्यांपासून शासनाकडून औषधांचा पुरवठाच झालेला नसल्याने रुग्णालय प्रशासनाला औषधींसाठी मोठी कसरत करावी लागत असून वेळ पडल्यास रुग्णांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासन टप्प्या-टप्प्याने स्थानिक स्थरावर औषधींची खरेदी करत आहे. परंतु यालाही काही मर्यादा असल्याने शासनाकडून तातडीने औषध पुरवठा होणे गरजेचे आहे.
या रुग्णालयांना होतो औषधांचा पुरवठा
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील औषधी भंडारमधून जिल्ह्यातील २ जिल्हा स्त्री रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालय, ५ ट्रामा केअर युनिट, विदर्भ सेवा रुग्णालय या सर्व शासकीय रुग्णांलयांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो. या सर्व रुग्णालय मिळून जवळपास महिन्याला दोन ते अडीच लाख रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. त्यामुळे या रुग्णांना जवळपास महिन्याला सहा ते सात कोटी रुपयांची औषधी लागते.
या औषधांचा भासतोय तुटवडा
शासकीय रुग्णालयांमध्ये अँटिबायोटिक, पेनकिलर, अॅटी एलर्जी, रक्तदाब, मधुमेह, मिर्गी, सर्दी, खोकला, ताप, शस्त्रक्रियेनंतर लागणारे प्रतिजैविके, मानसिक रुग्णांसाठी असलेल्या औषधांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते. परंतु सध्या याच औषधांचा तुटवडा शासकीय रुग्णालयांमध्ये आहे.
दोन कोटी औषधांची खरेदी
शासनाकडून मिळणारी औषधी अजूनही जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळालेली नाही. त्यामुळे सध्या स्थानिक स्थरावर रुग्णालय प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने औषधींची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत रुग्णालय प्रशासनाने दोन कोटी रुपयांची औषधी स्थानिक पातळीवर खरेदी केली आहेत. यातील ७० लाख रुपयांची औषधी रुग्णालयाला उपलब्ध झाली आहे.
औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून सध्या स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी करण्यात आली असून ती उपलब्ध देखील झाली आहेत. डीपीडीसी फंडातून काही औषधी खरेदी करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या औषधीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक