बीटीच्या ‘त्या’ वाणाचा यंदाही तुटवडा, विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांची मागणी नकोच, कृषी विभागाचे आवाहन
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 22, 2024 09:38 PM2024-05-22T21:38:11+5:302024-05-22T21:39:37+5:30
शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे.
अमरावती : सर्व बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या विशिष्ठ वाणांच्या बियाण्यांचा आग्रह धरू नये, बियाणे विकत घेताना एमआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊ नये, बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी, शिवाय बियाणे उपलब्ध असताना विक्रेता देत नसल्यास जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यातील काही परिसरात हंगामपूर्व लागवड होत असल्याने विशिष्ठ वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून हे लोण जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे. मागच्या हंगामातदेखील असाच प्रकार झाला होता. प्रत्यक्षात सर्व बीटी बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच असल्याचे कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी सांगितले.
जमिनीत पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. १६ मेपासून बियाणे जरी उपलब्ध होत असले तरी १ जूननंतरच कपाशीची लागवड करावी. पूर्वहंगामी कपाशी लागवडीने बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढून कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. यंदा बियाण्यांचा तुटवडा नाही, कपाशीच्या सर्व वाणाचे पुरेसे बियाणे पाकिटे उपलब्ध असल्याची माहिती आगरकर यांनी दिली.
------------------------
‘त्या’ वाणाच्या बियाण्यांचा यंदाही तुटवडा
शेतकऱ्यांद्वारा विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी केली जाते. कृषी विभागाने या वाणाच्या अडीच लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. प्रत्यक्षात २५ हजार पाकिटेच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे. त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे. १ जूननंतर पाऊस पडल्यानंतर बियाणे बाजारात गर्दी वाढणार आहे
------------------------
...तर विक्रेत्याचा परवाना होणार रद्द
शेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे उपलब्ध व साठा असताना जर विक्रेता देत नसेल तर त्यावर कारवाई होणार आहे शिवाय एमएसपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्या असेल, पक्की पावती देत नसेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास चौकशीअंती कारवाई करून संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
-----------------------
कपाशी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सर्व वाणांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची गडबड करू नये. बियाणे असताना विक्रेता देत नसल्यास किंवा एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास तक्रार करावी.
उज्ज्वल आगरकर
कृषी उपसंचालक