शॉर्टसर्किटने तीन एकरांतील गहू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:08 PM2019-04-29T23:08:57+5:302019-04-29T23:09:12+5:30
शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
येथील शेतकरी सुरेश जयसिंगपुरे यांचे नवबाग शिवारात चार एकर शेत आहे. त्यापैकी त्यांनी तीन एकरांत गव्हाची पेरणी केली होती. नियमित पाणी पीक वाढविले. काढणीवर आलेला गहू त्यांनी एक दिवस आधीच संवंगणी करून पिंडे बांधले होते. त्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या डीबीवर शॉर्टसर्किट होऊन काढणीस आलेला तीन एकरांवरील गहू पूर्णत: जळून खाक झाला. तसेच त्यांच्या शेतातील तीन वर्षे वयाची संत्रा झाडेसुद्धा जळाली. यात त्यांचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर डीबी उघडी असल्याचे त्यांनी महावितरणला कळविले होते. त्यामुळे या नुकसानीस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अचलपूर तालुक्यातील जवळपास सर्वच डीबी उघड्या आहेत. त्यांना झाकणे नाहीत. त्या किटकॅट, फ्युज नसलेल्या आहे. अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. दरम्यान जयसिंगपुरे यांच्या शेतात झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून त्यांना त्वरित मदत देण्याची मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष महेश सुरंजे यांनी केली आहे.