‘लव्ह जिहाद’ नावाची संघटना दाखवा आयुष्यभर गुलामी करेन, अबू आझमींचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:05 IST2022-11-14T19:02:27+5:302022-11-14T19:05:18+5:30
आमदार अबू आझमी यांचा भाजपवर निशाणा, कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव

‘लव्ह जिहाद’ नावाची संघटना दाखवा आयुष्यभर गुलामी करेन, अबू आझमींचं आव्हान
उज्ज्वल भालेकर
अमरावती : देशात सध्या धार्मिक वातावरण बिघडविण्याचे काम सुरु आहे. लव्ह जिहादचे नाव समोर करुन मुस्लीम बांधवांविषयी द्वेष पसरविण्याचे काम भाजप आणि आरएसएस करीत आहेत. अमरावतीतही अशाच प्रकारचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न येथील खासदारांनी केला. देशात कुठेही लव्ह जिहादच्या नावे संघटना नाही. तसेच हिंदू मुलींना फसविण्याच्या उद्देशाने कोणालाही पैसे दिले जात नाही. जर असे संघटन किंवा पैसे देण्याची घटना देशात कुठेही घडली असेल तर ते दाखवून द्या त्यांची आयुष्यभर गुलामी करेन, असे मत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
अमरावतीत समाजवादी पार्टीच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमासाठी अबू आझमी हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आझमी म्हणाले, ज्यांना संविधानच मान्य नाही असे लोक आज सत्तेत आहेत. संविधानानुसार १८ वर्षावरील सर्व मुला-मुलींना आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही धर्मातील मुला-मुलींसोबत लग्न करु शकतात. देशात अनेक मोठे हिंदू -मुस्लीम लग्न झाले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू-मुस्लीमांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे. लव्ह जिहादचे नाव समोर करत मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे. एनआयएच्या अहवालानुसार देशात कुठेच लव्ह जिहाद नावाचे संघटन नाही. तसेच हिंदू मुलींना पळवून नेण्यासाठी पैसे दिल्या जात नाही. जर असे देशात असे असेल तर ते दाखवून दिल्यास त्यांची आयुष्यभर गुलामी करेन तसेच राजकारण सोडायला तयार असल्याचे अबू आझमी म्हणाले.
भाजपशी लढण्यासाठी कॉँग्रेस मजबुत होणे आवश्यक
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात अबू आझमी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशातला सर्वात मोठा पक्ष आता सर्वात लहान पक्ष झाला आहे. परंतु भाजपशी लढण्यासाठी कॉँग्रेसला मोो होणे गरजेचे आहे. परंतु राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यानेतृत्वात कॉँग्रेस दिवसेंदिवस कमजोर होत आहे. पूर्वीची कॉँग्रेस आता राहिलेली नाही. भारत जोडो यात्रेतून कॉँग्रेसचे संघटन वाढेल, अशी आशा आहे.