अनियमिततेवर शिक्कामोर्तब, दर्यापूर एसडीओंना ‘शो कॉज नोटीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:27+5:302021-01-25T04:14:27+5:30

गजानन मोहोड अमरावती : दर्यापूरच्या उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यकाळात मंजूर बहुतांश प्रकरणांत अनियमितता असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट ...

'Show cause notice' to Daryapur SDOs, sealing irregularities | अनियमिततेवर शिक्कामोर्तब, दर्यापूर एसडीओंना ‘शो कॉज नोटीस’

अनियमिततेवर शिक्कामोर्तब, दर्यापूर एसडीओंना ‘शो कॉज नोटीस’

Next

गजानन मोहोड

अमरावती : दर्यापूरच्या उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यकाळात मंजूर बहुतांश प्रकरणांत अनियमितता असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांना शनिवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून १० दिवसांच्या आता खुलासा मागितला आहे. खुलासा असमाधानकारक असल्यास पुढील कारवाई शासनस्तरावर केली जाईल.

एसडीओ आंबेकर ४ डिसेंबरपासून सुटीवर असल्याने त्यांनी दिलेल्या पत्त्यावर रजिष्टर पोष्टाने ही नोटीस पाठविल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. प्रियंका आंबेकर यांना बजावलेली ‘शो कॉज नोटीस’ म्हणजे त्यांनी केलेल्या अनियमिततेवर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केल्याचे मानण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

दर्यापूरच्या एसडीओ आंबेकर यांच्या कार्यकाळात मंजूर बहुतांश एनए प्रकरणे, तुकडेबंदी, प्लॉटचे विभाजन व वर्ग २ मध्ये विक्री परवानगीमध्ये अनियमितता झाल्याविषयी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा व जनदरबारात वृत्त मालिका प्रसिद्ध केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समितीचे गठन करून चौकशी आरंभली. यामध्ये प्रियंका आंबेकर यांच्या सन २०१८ ते २०२० या कार्यकाळात मंजूर ४३ पैकी ४१ प्रकरणांत सहायक संचालक नगररचना, अमरावती (एडीटीपी) यांची परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हधिकाऱ्यांनी ८ जानेवारीला आदेश जारी करीत या ४१ प्रकरणांत कोणत्याही प्रकारचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास स्थगिती दिलेली आहे. हे आदेश म्हणजे एसडीओ आंबेकर यांच्या अनिर्बंध कारभाराला जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेला लगाम आहे व आता बजावलेली नोटीस म्हणजे अनियमिततेवर शिक्कामोर्तब मानण्यात येत आहे.

बॉक्स

जिल्हा समितीचा १५० पानांचा अहवाल

जिल्हा समितीद्वारा दोन आठवडे सातत्याने सर्व प्रकरणांची चौकशी व पडताळणी केली असता, अनियमिततेचे घबाडच हाती लागले. साधारण १२५ ते १५० पानांचा हा अहवाल जिल्हधिकारी नवाल यांना गुरुवारी सादर करण्यात आला व त्यानंतर शुक्रवारी उशिरा आंबेकर यांना ‘शोकॉज नोटीस’ बजावण्यात आली. खुलासा असमाधानकारक असल्यास विभागीत चौकशी किंवा अन्य शिफारस विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला करण्यात येणार आहे.

बॉक्स

‘तो’ वाहनचालक कोतवालाचे जागी रुजू

एसडीओ आंबेकर यांचा वाहनचालक एक कोतवाल होता. आंबेकर यांच्या विश्वासातील या वाहनचालकाचे नाव अनेक प्रकरणांत समोर आलेले आहे. महसूल प्रशासनात या वाहनचालकाविषयीच्या चर्चा सुरू झाल्याने त्याला त्याचे मुळ जागी म्हणजेच तलाठी कायार्लयात कोतवाल म्हणून रुजू केल्याचे सांगण्यात आले.

पाईंटर

आंबेकर यांच्यावरील आक्षेप

* एडीटीपीच्या शिफारशीशिवाय एनए

*वर्ग २ मध्ये विक्री परवानगीमुळे शासकीय रकमेचे नुकसान

* प्लॉटच्या विभाजनातही एडीटीपीची शिफारस नाही

* तुकडेबंदीच्या आदेशात नियम डावलले

Web Title: 'Show cause notice' to Daryapur SDOs, sealing irregularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.