संपकरी अंगणवाडी सेविकांना ‘शो कॉज’; खुलासा सादर करण्याचे आदेश
By जितेंद्र दखने | Published: January 4, 2024 11:04 PM2024-01-04T23:04:40+5:302024-01-04T23:05:26+5:30
महिला व बालकल्याण विभागाची कार्यवाही : खुलासा सादर करण्याचे आदेश
अमरावती: जिल्हाभरात गत महिनभरापासून २ हजार ४६२ अंगणवाडी सेविका, मदतनीस विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. यामुळे सर्व अंगणवाडी केंद्राना टाळे लागले आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना विना परवानगीने गैरहजर असल्याचे कारण पुढे २३१५ अंगणवाडी सेविका, १४७ मिनी अंगणवाडी सेविका आणि २४०० मदतनीस आदींना नोटीस बजाविलेल्या आहेत.
अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गत ४ डिसेंबर पासून जिल्हाभरातील २३१५ अंगणवाडी सेविका आणि २४०० मदतनीस आणि १४७ मिनी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. या संपामुळे महिनाभरापासून अंगणवाड्यांना टाळे लागले. याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना विना परवानगीने गैरहजर असल्याने अंगणवाडी केंद्रातील कामकाज खोळंबलेले आहेत. विशेष म्हणजे नव्याने अंगणवाडी सेविका म्हणून रुजू होऊन एक वर्षाचाही कालावधी झाला नाही. नियुक्ती आदेशाद्वारे करारनाम्यामध्ये अंतर्भूत असून काम असमाधानकारक असल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वनोटीस न देता कामावरून कमी करण्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यानुसार कामावर हजर होण्याबाबत वारंवार कळविले आहे. परंतु यावर कुठलाही खुलासा केलेला नसल्याने तसेच अंगणवाडी केंद्रात विना परवानगी गैरहजर राहणे, अंगणवाडी केंद्रामध्ये अस्वच्छता पाळणे, कामकाज खोळंबलेली आहेत. बालकांची काळजी घेण्याबाबत न सांगणे, बालकांचे लसीकरणकरिता केंद्रात न आणणे या कृतीमुळे पहिल्या टप्प्यात नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजाविलेल्या आहेत. दुसऱ्या टप्यात इतरही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर प्रशासनाने संबंधितांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कडक कारवाईचा इशारासुद्धा दिला आहे.
सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहे. यामुळे यापैकी बहुतांश सेविका मदतनीस कामावर हजर झाल्यात. उर्वरित अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. तात्काळ खुलासा सादर न केल्यास कडक कारवाई केली जाईल.
डॉ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ महिला व बालकल्याण विभाग
जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी गत ४ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. मात्र प्रशासनाकडून सन २००७ च्या परिपत्रकांचा अनर्थ करून चुकीच्या पद्धतीने सेविका व मदतनीस यांना नोटीस बजाविलेल्या. नोटीस बजावण्याबाबत सरकारी नियम, कायदा नसताना हा प्रकार चुकीचा आहे. याविरोधात येत्या ८ तारखेला तीव्र आंदोलन केले जाईल.
महेश जाधव,
जिल्हाध्यक्ष अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे आयटक
दृष्टिक्षेपात
एकूण सेविका-२३१५
मदतनीस-२४००
मिनी अंगणवाडी सेविका-१४७
कर्तव्यावर हजर झालेल्या सेविका
अंगणवाडी सेविका-६५
मदतनीस-३८५
मिनी अंगणवाडी सेविका-०२