डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:26 AM2018-09-07T01:26:03+5:302018-09-07T01:27:56+5:30
लहान-सहान कारवाईत उदोउदो करून घेण्याऐवजी मोठ्या कारवाईत डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहाल, असा इशाराच पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी आपल्या कक्षात बोलावून गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून तंबी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लहान-सहान कारवाईत उदोउदो करून घेण्याऐवजी मोठ्या कारवाईत डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहाल, असा इशाराच पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी आपल्या कक्षात बोलावून गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून तंबी दिली.
शहरातील गुन्हेगारी घटनांचा छडा लावण्यात मुख्य भूमिका असलेली गुन्हे शाखा काही दिवसांपासून निद्रिस्त असल्याचे निदर्शनास आले. अवैध दारू व्यवसाय, जुगार अड्डे यांसारख्या छोट्या कारवाया करून कामगिरी दाखविली जात आहे. मात्र, अमरावती सारख्या शहरात अवैध धंद्यांसोबत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता, गुन्हे शाखेच्या कारवाईचा रेशो अत्यल्प आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी या बाबीवर बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेचा तासभर ‘क्लास’ घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी अशी सर्वांचीच उपस्थिती होती. प्रमुख या नात्याने सीपी बाविस्कर यांनी अधिकारी, कर्मचाºयांना डिटेक्शनचा रेशो वाढविण्यासंदर्भात ताकीद दिली. छोट्या कारवायांचे श्रेय लाटू नका, मोठी कामगिरी करा, तरच गुन्हे शाखेत राहा, अशा शब्दात सीपींनी ताकीद दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रत्येकाने चोख कर्तव्य बजावून आपआपल्या कामगिरीचा परिचय द्यावा, असेही सीपींनी सांगितले.