खाकीचा वचक दाखवा; पालकमंत्र्यांनी सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:25 AM2017-12-08T00:25:24+5:302017-12-08T00:26:13+5:30
काही गुन्ह्यांत घट झाली असली तरी घरफोडीच्या घटना या वाढत्याच आहेत. गुन्हेगार कायद्याला जुमानत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी खाकीचा धाक दाखवा, अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्यांना सुनावले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : काही गुन्ह्यांत घट झाली असली तरी घरफोडीच्या घटना या वाढत्याच आहेत. गुन्हेगार कायद्याला जुमानत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी खाकीचा धाक दाखवा, अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्यांना सुनावले.
जिल्ह्यधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थासंदर्भात बैठक आयोजित होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांच्यासह पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, शशिकांत सातव, सहायक आयुक्त पी.डी. डोंगरदिवे, चेतना तिडके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शहरात बायपास व रिंगरोडवर बरेच युगुल आढळून येतात. त्यांच्यावर अनुचित प्रकार घडतात. या प्रकाराला आवर घालण्यासाठी शाळा व महाविद्यालयात साध्या गणवेशात कर्मचारी नेमा. छेडछाड करणारे आढळताच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अनेकदा अतिप्रसंग व जातिवाचक प्रकरणात खोट्या तक्रारी व गुन्हे दाखल होतात. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वी प्रकरणाची चौकशी करा. शहरासह ग्रामीण भागात अनेक चौकात आॅटोरिक्षाचालकांचे वर्तन चांगले नाही, अशा तक्रारी आहेत. यासंदर्भात गंभीरतेने दखल घ्या. अनेक बँकामध्ये नागरिकांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. यासाठी कठोर कारवाई करा, असे पालकमत्र्यांनी सांगितले.
शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे वाढत आहेत. गुन्हेगार कायदा जुमानत नाहीत. त्यांचा कुठलाही मुलाहिजा करू नये. अनेक तडिपाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, ती त्वरित निकाली काढा. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असलाच पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करा, असे त्यांनी सागितले. रेतीच्या वाहनांवर बेकायदेशीर असल्यासच कारवाई करा अन्यथा महसूल विभाग, तहसीलदारांना कारवाई करू द्या, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
अन्य गुन्ह्यांमध्ये घट, घरफोड्यांमध्ये वाढ
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा खुनाची प्रकरणे १० ने कमी आहेत, तर घरफोडीची प्रकरणे १० टक्क्यांनी वाढली आहेत. हे गुन्हे रोखण्यासाठी रात्रीची गस्त, सायकल गस्त, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून कारवाई, बाँड, कोम्बिंग आॅपरेशन, दिवसा व रात्रीची नाकेबंदी, पेट्रोलिंग आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. छेडछाडीसह इतर गुन्हे रोखण्यासाठी आठ दामिनी पथके तैनात आहेत. अशा प्रकरणांमध्ये ६०३ कारवाया करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बैठकीत दिली.