श्री अंबादेवी संस्थानचा कारभार अपारदर्शक

By admin | Published: July 11, 2017 12:02 AM2017-07-11T00:02:57+5:302017-07-11T00:02:57+5:30

अंबानगरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी संस्थानच्या कारभारात पारदर्शकता नसून ...

Shree Ambadevi Institute's Operational Opaque | श्री अंबादेवी संस्थानचा कारभार अपारदर्शक

श्री अंबादेवी संस्थानचा कारभार अपारदर्शक

Next

धर्मदाय सहआयुक्तांचा ठपका : नोटीस बजावली, १३ जुलैपर्यंत द्यावे लागणार स्पष्टीकरण
वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी संस्थानच्या कारभारात पारदर्शकता नसून संस्थानच्या कामकाजात अनेक त्रुटी, उणिवा असल्याचा ठपका ९ दिवसांच्या निरीक्षणाअंती धर्मदाय सहआयुक्तांनी ठेवला आहे. धर्मदाय सहआयुक्तांच्या आदेशान्वये संस्थानच्या विश्वस्तांना १३ जुलैपर्यंत यासंदर्भात खुलासा सादर करावा लागणार आहे. निरीक्षणादरम्यान संस्थानच्या कारभारात तब्बल ६४ त्रुटी आढळल्या असून त्यापैकी ९ गंभीर त्रुटींवर धर्मदाय सहआयुक्तांनी बोट ठेवले आहे. श्री अंबादेवी संस्थानचे पक्षपाती धोरण आणि येथील अनियमिततेसंदर्भात ‘लोेकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तांच्या आधारे धर्मदाय सहआयुक्तांनी ही कारवाई केली, हे विशेष.
श्री अंबा-एकवीरा देवी म्हणजे केवळ वैदर्भियांचेच नव्हे तर राज्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान. वर्षातून देवीचे दोन नवरात्रौत्सव उत्साहात साजरे केले जातात. चैत्र आणि अश्विन नवरात्रौत्सवात येथे राज्यभरातून भक्तांची गर्दी उसळते. वर्षभर येथे भक्तांचा राबता असतो. संस्थानचे उत्पन्न देखील भरपूर आहे. मात्र, दानपेटीत महिन्याकाठी गोळा होेणाऱ्या जवळपास लाखभराच्या रकमेचा विनियोग नेमका कुठे केला जातोे, याबाबत काही भक्तांनी असंतोष व्यक्त केला आहे. शिवाय संस्थानच्या विश्वस्तांकडून नवरात्रौत्सवादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादातही ‘पंक्तीप्रपंच’ केला जात असल्याचे ‘लोकमत’ने एका वृत्तातून प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अंबादेवी मंदिरातील अंगारापात्रात चक्क मृत पाल आढळल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमतम’ध्ये प्रकाशित झाले.
धर्मदाय सहआयुक्तांनी श्री अंबादेवी संस्थानचे २० मे रोजी निरीक्षण केले. निरीक्षकांनी ११ ते २० मे दरम्यान केलेल्या निरीक्षणात तब्बल ६४ त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी अतिगंभीर त्रुटी, उणिवांसंदर्भात धर्मदाय सहआयुक्तांनी संस्थानला १७ जून रोजी नोटीस बजावली आहे. यानुसार १३ जुलैपर्यंत संस्थानला त्रुटी, उणिवांबाबत सप्रमाण स्पष्टीकरण द्यायचे आहे.
दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास अथवा खुलासा समाधानकारक न आढळल्यास हे प्रकरण धर्मदाय सहआयुक्तांकडे महाराष्ट्र मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ डी, ८३, ३९ अंतर्गत कारवाईकरिता दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
धर्मदाय सहआयुक्त ए.एस.राजन्देकर यांच्या मार्गदर्शनात धर्मदाय उपायुक्त आर.जी.मामू, निरीक्षक आर.एस.गुल्हाने, एस.आर. राऊत, छाया तिवारी यांनी संस्थानबद्दल निरीक्षण नोंदविले.

धार्मिक संस्थानांना पारदर्शक राहण्याचे आवाहन
श्री अंबादेवी संस्थानला बजावलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमिवर धर्मदाय सहआयुक्त ए.एस.राजन्देकर यांनी इतर धार्मिक संस्थानांना पारदर्शकत्व जपण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक संस्थानांनी सर्व दस्तऐवज अद्ययावत ठेवून सर्व व्यवहारांचा लेखाजोखा तयार ठेवावा, असे राजन्देकरांनी सुचविले आहे.

निरीक्षणादरम्यान आढळलेल्या त्रुटी
संस्थानच्या मालकीची ४५० एकर जमीन आहे. मात्र, या जमिनीचे रेकॉर्ड व खर्चाचा ताळमेळ योग्य पद्धतीने ठेवलेला नाही. अकृषक शेतीच्या विनियोगाचे नियोजन नाही. शासकीय प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा कोणताही लेखाजोखा उपलब्ध नाही.

श्री अंबादेवीला दान म्हणून प्राप्त होणारे चांदी-सोन्याचे अलंकार, वस्तू यांच्या गलाईचा व विक्रीचा कोणताही हिशेब नाही.

संस्थानने घेतलेल्या कर्जाची पूर्वपरवानगी धर्मदाय सहआयुक्तांकडून न घेता कर्जाची उचल केली गेली.

संस्थानच्या बँकेतील जमा ठेवी या कार्यालयाच्या रेकॉर्डवर घेतलेल्या नाहीत.

कर्जाचा उल्लेख हिशेबपत्रकाच्या जमेच्या बाजूला दाखविलेला नाही.

टीडीएस, आयकर भरण्यास विलंब केल्याने संस्थानला दंड भरावा लागला.

संस्थानच्या लेजर अकाऊंटमधील बांधकाम दानपेटीचा हिशेब आमदनीतील बांधकाम दानपेटीशी जुळून येत नाही.

मंदिराच्या बांधकामासाठी प्राप्त निधी इतर बांधकामाकरिता वापरण्यात आला.

भक्तांमध्ये तीव्र असंतोष
पंचक्रोशीतील भक्तांची श्री अंबादेवीवर अपरिमित श्रद्धा आहे. त्यामुळे यामंदिरात सतत भक्तांची मांदियाळी असते. सश्रद्ध नागरिक मंदिराच्या दानपेटीत मोठी रक्कम टाकतात. मंदिराच्या तसेच संस्थानच्या विकासासाठी या रकमेचा विनियोग व्हावा, अशी स्वाभाविकपणेच भक्तांची अपेक्षा असते. मात्र, रकमेचा विनियोग संस्थानद्वारे पारदर्शकरित्या केला जात नसल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा भक्तांनी केला आहे. पाणी, महिलांसाठी प्रसाधनगृह आदी क्षुल्लक सोयी देखील संस्थानने केल्या नसल्याने हा पैसा जातो कुठे, असा सवाल भक्तांनी उपस्थित केला असून तसे निरीक्षण निरीक्षकांनी नोंदविले आहे.

धर्मदाय सहआयुक्त कार्यालयातर्फे नियमित तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गंभीर त्रुटी नाहीत. त्यांच्या नोटीसवर संस्थानतर्फे उत्तरे देण्यात येईल. संस्थानचे कामकाज हे पारदर्शक आहे.
अतुल आळशी, सचिव, अंबादेवी संस्थान

धर्मदाय सहआयुक्त कार्यालयामार्फत नोटीस मिळाली आहे. मात्र, अंबादेवी संस्थानचे कामकाज पारदर्शक असून नोटीसद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण देऊ.
- सूर्यकांत कोल्हे, व्यवस्थापक,
अंबादेवी संस्थान

Web Title: Shree Ambadevi Institute's Operational Opaque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.