श्री हव्याप्र मंडळात भिंत फोडून १२ शिलाई मशिनची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:25 PM2017-08-08T23:25:58+5:302017-08-08T23:27:57+5:30
तीन ठिकाणी भिंतीला छिद्र करून अज्ञात चोरांनी १२ शिवणयंत्रे लंपास केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन ठिकाणी भिंतीला छिद्र करून अज्ञात चोरांनी १२ शिवणयंत्रे लंपास केल्या. ही घटना मंगळवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत घडली. राजापेठ पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या आधारे तपास सुरू केला.
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व बँक आॅफ महाराष्ट्रच्या मार्डेफ ट्रस्टद्वारे महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालते. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या प्रशिक्षण संस्थेत महिलांना नि:शुल्क शिवणयंत्र प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी या प्रशिक्षण संस्थेत १३ शिवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या संस्थेतून शेकडो महिलांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवले आहेत. सोमवारी सायंकाळी प्रशिक्षण केंद्र बंद झाल्यावर मंगळवारी सकाळी अनिलकुमार रामाधीन मंडळ (५९, रा. दत्तवाडी) यांनी उघडले असता त्यांना प्रशिक्षण केंद्रात शिवणयंत्रे नसल्याचे निदर्शनास आले. राजापेठ पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यशाळा हॉल, क्लासरूम हॉल व कार्यालयातून १२ शिवणयंत्रे, एलसीडी व एक इर्न्व्हटर असा एकूण ३८ हजारांचा माल लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. अधिक तपास सुरू आहे. हव्याप्र मंडळाची सुरक्षा भेदून करण्यात आलेल्या या धाडसी चोरीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
औरंगपुºयाजवळील नाल्यातून आलेत चोर
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूस अंबा नाला असून त्याशेजारीच औरंगपुरा परिसर आहे. चोरटे हे नाल्यातून प्रशिक्षण कक्षात शिरल्याचा संशय होता. मात्र, नाल्यातील चिखलातून प्रशिक्षण संस्थेपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला.
नियोजित चोरी
ज्या व्यक्तीला प्रशिक्षण केंद्राची इत्यंभूत माहिती आहे, अशाच व्यक्तीने प्रिप्लॅनिंग चोरी केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. प्रशिक्षण केंद्रावरील चौकीदार ड्युटी करून सकाळी घरी गेला. त्यालाही या चोरीसंदर्भात भनक लागली नव्हती. त्याचीही पोलीस चौकशी करणार आहे.
शिलाई मशिन चोरी गेल्याच्या घटनेत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. नाल्यात गाळ असल्याने तेथून चोर येणे शक्य नाही. दाराचे कुलूप तुटलेले नाही. चोर शातीर असून सर्व बाजू तपासून चौकशी सुरु आहे.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ