अमरावतीमध्ये श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह ३० नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:24 AM2018-11-27T11:24:49+5:302018-11-27T11:25:49+5:30
विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते आणि आ. रामदास आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होईल. अध्यक्षस्थानी संस्थानच्या अध्यक्ष विद्या देशपांडे राहतील. याच दिवशी सायंकाळी साडेसहाला विदुषी सानिया पाटणकर (पुणे) आणि रात्री ८ वाजता पं. धनंजय जोशी (नांदेड) गायन सादर करतील. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहाना बॅनर्जी (कोलकाता) यांचे सतारवादन होईल. रात्री ८ वाजता गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे जावई पं. रमाकांत गायकवाड (पुणे) हे ठुमरी टप्पा दादरा गायन सादर करतील. या दोन्ही मैफलींना ईशान घोष यांची तबला संगत राहील. २ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता पं. सुखदेव चतुर्वेदी (मुंबई) यांचे ध्रुपद गायन होईल. रात्री ८ वाजता पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने समारोहाचे समापन होईल. या नि:शुल्क आनंददायी सोहळ्याला उपस्थित राहून अमरावतीकरांनी अभिजात संगीताचा आनंद लुटावा, असे आवाहन श्रीअंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.