अमरावतीत श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २९ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:11 PM2019-11-28T12:11:54+5:302019-11-28T12:12:19+5:30
श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे.
यंदाच्या महोत्सवात २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शोभा चौधरी (इंदौर) या गायन सादर करतील. त्याच दिवशी रात्री ८ वाजता बनारस घराण्याचे विख्यात गायक पद्मभूषण पं. राजन व पं. साजन मिश्रा आपले गायन सादर करतील. त्यांना तबलासंगत पं. संदेश पोपटकर व संवादिनी संगत श्रीकांत पिसे (रा. नागपूर) हे करणार आहेत. ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील जुई धायगुडे-पांडे यांचे गायन होईल. त्याच दिवशी रात्री ८ वाजता जयपूर येथील उस्ताद नफीसुद्दीन व उस्ताद अनिसुद्दीन हे डागर बंधू धृपद धमार गायन सादर करतील. विशेष आयोजनात १ डिसेंबर १९ रोजी सकाळी १० वाजता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य ‘कट्यार’फेम महेश काळे हे गायन सादर करतील, तर सायंकाळी ६ वाजता पद्मभूषण पं. विश्वमोहन भट्ट (जयपूर) व संतुरवादक तरूण भट्टाचार्य (कोलकाता) यांची मोहनवीणा व संतूर यांची जुगलबंदी होईल. त्यांना सुब्रतो भट्टाचार्य (कोलकाता) हे तबलासंगत करतील. त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता समारोपीय सत्रात धारवाड येथील पद्मश्री पं. वेंकटेशकुमार यांचे गायन सादर होईल.
श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात होणाऱ्या या नि:शुल्क कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने मंगळवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.