रिद्धपुरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा, तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:18 AM2021-09-09T04:18:11+5:302021-09-09T04:18:11+5:30
रिद्धपूर-अमरावती : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी ...
रिद्धपूर-अमरावती : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र प्रारंभ करण्याची औपचारिक घोषणा श्री चक्रधर यांच्या ८०० वर्षे अवतरण दिनी बुधवारी करण्यात आली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू हनुमान प्रसाद शुक्ल यांनी रिद्धपूर येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. प्र-कुलगुरू चंद्रकांत रागीट आणि केंद्र प्रभारी राजेश लेहकपुरे याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगिराज नागराज बाबा होते. याप्रसंगी डॉ. अनिल बोंडे, कारंजेकरबाबा, दिनेश सूर्यवंशी तथा विश्वविद्यालय के प्रोफेसर रविंद्र बोरकर, डॉ. सीमा बरगट, डॉ. अनिकेत आंबेकर, जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे,, आरती तेलगोटे, राजदीप राठौडसह चक्रधर स्वामींचे अनुयायी आणि विविध केंद्रांवरील महंत उपस्थित होते. रिद्धपुरातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू करण्याची घोषणा हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल यांनी ७ सप्टेंबरला नागपुरात केली होती. रिद्धपूर येथे एक आचार्य पीठ स्थापन करण्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली.
नव्या शिक्षण पद्धतीनुसार भारतीय भाषांना सोबत घेऊन जनमनाची भाषा विकसित करण्यासाठी हिंदी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्यादृष्टीने रिद्धपूर येथील हे केंद्र तत्त्वज्ञान और मराठी भाषेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. या केंद्राचे कार्य आणि शैक्षणिक सत्र याच वर्षात सुरू होणार आहे, असे हनुमान प्रसाद शुक्ल म्हणाले. विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाचे सहायक प्राध्यापक राजेश लेहकपुरे यांच्याकडे केंद्राचा कारभार सोपविण्यात आला. हे केंद्र महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे उपकेंद्र राहील. मराठी साहित्य व अन्य भारतीय भाषांच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास, मराठी भाषेतील उपलब्ध ज्ञानाचा अनुवाद आणि धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृतीच्या अभ्यासासाठी हे केंद्र साहाय्यक ठरेल, असा विश्वास राजेश लेहकपुरे यांनी व्यक्त केला.