सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र सालबर्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:27 AM2019-03-04T01:27:43+5:302019-03-04T01:28:17+5:30
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत भरते. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत भरते. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भाविकांची वाढती गर्दी पाहता, महाराष्ट्र व मध्यप्रदेश प्रशासनाच्यावतीने यात्रेदरम्यान तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लहान महादेव या नावाने ओळखले जाणारे सालबर्डी हे स्थळ मोर्शीपासून आठ किलोमीटर अंतरावर असून, निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कारच आहे. गावाच्या अवतीभोवती घनदाट वृक्ष, एका कडेला पर्वतीय भाग व दुसऱ्या कडेला माडू व गडगा नदीचा संगम आहे. याठिकाणी अनेक निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक स्थळे व ऐतिहासिक शिल्प आहेत. त्यामध्ये शिवलिंग भुयार, पांडव कचेरी, मुक्ताबाईचे मंदिर, मौन्य देव मंदिर, हत्तीडोहाचा समावेश आहे. भारतात महादेवाची दोन शक्तिपीठे आहेत. पचमढीला मोठा महादेव, तर सातपुड्याच्या कुशीत वसलेला लहान महादेव. सालबर्डी येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या काळात भक्तिभावाने भाविक त्रिशूल, डफडी व मुखी ‘महादेवा जातो गा’ या लोकगीताची आवर्तने करतो. यामुळे परिसर अक्षरश: दुमदुमून जातो. सालबर्डी गावापासून एक किलोमीटर अंतरावर चालत गेल्यावर पहिल्या पायरीपासून भुयाराकडे जाणारा मार्ग सुरू होतो. जवळपास शंभर फूट उतरल्यानंतर एका विशाल दगडाच्या आतल्या पोकळीत सपाट जागेवर शिवलिंग आहे. ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर देशभरातून भाविक भक्तगण लहान महादेवाच्या दर्शनासाठी रीघ लावणार असून, त्या दृष्टीने महाराष्टÑ व मध्यप्रदेश प्रशासन अथक परिश्रम घेत आहे.