अचलपूरच्या ठाण्यात शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:27 PM2019-04-16T22:27:29+5:302019-04-16T22:27:52+5:30
जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.
धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील अजय बाबूलाल बेठेकर (२५) व प्रगती घिसूलाल धुर्वे (२०) यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी अचलपूर पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सेवानंद वानखडे यांना संपूर्ण हकिगत सांगितली. लग्नाला घरच्यांचा विरोध असून, आम्ही सज्ञान आहोत, असे त्यांनी सांगितले. दस्तावेज प्रमाणित झाल्याने ठाणेदार सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर काळे, ललिता पटेल, महिला पोलीस शिपाई रेश्मा भोंबे, संजय ठाकरे, रवि बावणे या कर्मचाऱ्यांनी या प्रेमीयुगुलाचा आदर्श विवाह सोहळा लावला. या लग्नाची माहिती त्यांनी धारणी ठाणेदारांना कळविली.