‘संकल्प’च्या सामूहिक विवाह सोहळ्यात ७१ जोडप्यांचे शुभमंगलम्
By गणेश वासनिक | Published: June 17, 2023 04:35 PM2023-06-17T16:35:24+5:302023-06-17T16:37:00+5:30
वधु-वरांना माहेरची भेटवस्तू प्रदान; गरीब, सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना मोठा दिलासा
अमरावती : येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शुक्रवारी पार पडलेल्या आंतरजातीय सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ७१ जोडपी विवाहबद्ध झालेत. यावेळी उद्योजक नितीन कदम, नीशा कदम यांनी वधु-वरांना माहेरची भेटवस्तू प्रदान करीत कन्यादान केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात वऱ्हाडींनी एकच गर्दी केली होती.
बडनेरा मार्गालगतच्या जाधव पॅलेस येथे विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पुसदच्या कासोळा येथील महर्षी मातंग ऋषी धर्मपीठाचे सद्गुरू गजानंद माऊली तर उद्घाटक म्हणून नितीन कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, भदंत श्रीपाद थेरो, मानवी हक्क अभियानाचे उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, गजानन रडके, समीर देशमुख, गणेशदास गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रकाश खरूले, नयन मोंढे, विनोद मोदी, राम नवाथे, जीवन गायकवाड, राणी कदम, पूनम खडसे, चंदा बोडसे, दिनेश मेश्राम, प्रवीण सावळे, संजय ठाकरे, मिलिंद बांबल, डॉ. रूपये खडसे, मनजीत सिंग, गोंविद कासट आदी उपस्थित होते. या विवाह साेहळ्यात वऱ्हाडींसाठी जेवनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली हाेती. त्या-त्या धर्माच्या विधीनुसार ७१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. यात हिंदू, बौद्ध धर्मीय जोडप्यांची संख्या अधिक होती.
देशाभिमान जागविला
सामूहिक विवाह सोहळ्यात विधीवत चालिरीतीनुसार वधु- वरांचे लग्न आटोपताच सामूहिक राष्ट्रगीताचे गायन झाले. विवाह सोहळ्यात वधू-वरांची जात, धर्म, पंथ वेगवेगळे असले तरी राष्ट्र अगोदर हा संदेश देताना राष्ट्रगीत गायनाने देशाभिमान जागविला, हे विशेष. नितीन कदम यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.