विद्यापीठाच्या निकालात सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:08 PM2019-02-14T23:08:01+5:302019-02-14T23:08:17+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाइन केला आहे. मूल्यांकन, निकाल, प्रश्नपत्रिका आदी बाबी आॅनलाइन झाल्या आहेत. मात्र, निकालाची घसरगुंडी कायम आहे. हिवाळी परीक्षा आटोपून कधीचेच ४५ दिवस ओलांडले. फेब्रुवारी महिना उजाडला तरीही हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे फार्म कधी भरावे, या विवंचनेत विद्यार्थी आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी आॅनलाईन, आॅफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या हिवाळी परीक्षांना प्रारंभ झाला. ३ जानेवारी २०१९ रोजी शेवटचा पेपर आटोपला. यादरम्यान एकूण ५८७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, नव्या विद्यापीठ कायद्यानुसार ४५ दिवसांतच निकाल जाहीर होणे अनिवार्य असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विद्यापीठात येरझारा मारून थकले आहे. निकाल कधी जाहीर होणार, हे परीक्षा विभाग ठामपणे सांगू शकत नाही, अशी एमसीए विषयाच्या विद्यार्थ्यांची ओरड आहे. गुरुवारी बी.ई.च्या पेपर ४ विषयांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती आहे. निकालात विलंब टाळता यावा, यासाठी सिनेट सभेने माइंड लॉजिककडून परीक्षेशी संबंधित कामे काढण्याचा निर्णय घेतला. आता नवी एजन्सी नियुक्त झाली असली तरी निकालात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. निकालात सावळागोंधळ असल्यामुळे विद्यार्थीदेखील त्रस्त झाले आहेत. हिवाळी परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी केव्हा परीक्षा अर्ज सादर करावा, अभ्यास कसा करावा, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. एका एजन्सीकडे असलेला डेटा दुसऱ्या एजन्सीकडून ट्रान्सफर करण्यास किती काळ लागेल, हा बिकट प्रश्न आहे.
अभियांत्रिकीचे निकाल जाहीर होत आहे. पुढच्या टप्प्यात एमसीएचे निकाल लावले जातील. काही तांत्रिक अडचणी असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत आहोत.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, अमरावती विद्यापीठ