विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक शाळेत 'सिक रूम' बंधनकारक !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 10:55 AM2024-11-05T10:55:12+5:302024-11-05T10:56:14+5:30

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : गरजेनुसार डॉक्टर 'ऑन कॉल' सुविधा उपलब्ध

'Sick room' is mandatory in every school to protect the health of students! | विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक शाळेत 'सिक रूम' बंधनकारक !

'Sick room' is mandatory in every school to protect the health of students!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
शाळेत प्रथमोपचाराकरिता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी फर्स्ट एड किंवा सिक रूम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. 


राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे 


तपासणी शिबिरात द्यावे प्रशिक्षण 
शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास, कृत्रिम वायुजिवन व इतर तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे. शाळेनजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांच्याशी समन्वय ठेवण्यात यावा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकाने रुग्णास तत्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी. शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी ऑन कॉल सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर ऑन कॉल सुविधा उपलब्ध द्यावी, असे निर्देशदेखील देण्यात आले.


समुपदेशक नेमा 
आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांकरिता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करावी, या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मागदर्शन करणे देखील बंधनकारक आहे.

Web Title: 'Sick room' is mandatory in every school to protect the health of students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.