बॉम्बस्फोटातील आरोपींवर ‘एसआयडी’ची नजर, अमरावती, नागपूर कारागृहात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 07:46 PM2017-10-06T19:46:08+5:302017-10-06T19:46:16+5:30
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम मुंबईत पुन्हा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत असल्याचे उघडकीस आले आहे.
अमरावती: कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम मुंबईत पुन्हा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य गुप्त वार्ता विभागाला (एसआयडी) दिल्याची माहिती आहे.
मुंबईत १९९३ मध्ये दाऊद इब्राहिम याने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. या बॉम्बस्फोटातील काही आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. तर ११ जुलै २००६ मध्ये मुंबईत रेल्वे गाड्यांमध्ये तर १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुणे येथील बेकरीत बॉम्बस्फोटाची मालिका घडवून आणल्याप्रकरणीचे आरोपी अमरावती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
यापैकी काही जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र, नुकतेच दाऊद इब्राहिम याने मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे त्याच्या हस्तकांचे सांकेतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे गृह विभागाने मुंबई बॉम्बस्फोेटाशी निगडीतांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एसआयडीवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार बॉम्बस्फोटातील आरोपींना आतापर्यत कोणी भेटी दिल्यात, याबाबतची माहिती जुळविली जात आहे. कारागृहात आॅनलाईन भेटीदरम्यान आरोपींसोबतची नाती, रहिवासी पत्ता, आधारक्रमांक, ओळखपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी एसआयडीचे अधिकारी करतील, अशी माहिती आहे. दहशतवादी अबू सालेम याचा साथीदार असलेला अब्दूल हसन मेंहदी हा खुनाच्या आरोपात अमरावती कारागृहात ३१ जानेवारी २००३ पासून जेरबंद आहे. त्यामुळे विदर्भातील नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना गृहविभागाच्या आहेत.
आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्याचे निर्देश
नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यांच्या एकुणच हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एसआयडीवर जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटातील आरोपींची यादी शासनाने मागविली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासन अलर्ट झाले असून सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे अमरावती मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाºयाने सांगितले.
कोट
‘‘ अमरावती कारागृहात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नाहीत. परंतु अन्य बॉम्बस्फोटातील आरोपी बंदिस्त असून त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
रमेश कांबळे
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.