सिद्धक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:33+5:302021-08-21T04:16:33+5:30

श्रावणात श्रावक, पर्यटकांना भुरळ, धुक्याची चादर करजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून अवघ्या देशभरात विख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील ...

Siddhakshetra Muktagiri is covered with green shalu | सिद्धक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू

सिद्धक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू

googlenewsNext

श्रावणात श्रावक, पर्यटकांना भुरळ, धुक्याची चादर

करजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून अवघ्या देशभरात विख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मुक्तागिरीने हिरवा शालू पांघरला आहे. ऑगस्ट महिन्यात मुक्तागिरी चोहोबाजूंनी असलेला सातपुडा पर्वत हिरवागार झाला आहे, तर 250 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा मन मोहून टाकत आहे. श्रावणात श्रावक व पर्यटक यांची पावले आपसूकच मुक्तागिरीकडे वळतात. गेल्या वर्षी श्रावक व पर्यटक यांचा कोरोनामुळे हिरमोड झाला; परंतु यावर्षी शासनाचे आदेश येईपर्यंत प्रवेश निषिद्ध होता; परंतु सध्या प्रवेश सुरू असल्याने हजारोंच्या वर श्रावक व पर्यटकांची वर्दळ असते. सातपुड्याच्या कुशीत वसलेली शुभ्र रंगाची 52 प्राचीन मंदिरे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. ही मंदिरे, हिरवेगार पर्वत, धबधबा, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी यामुळे अतिशय रमणीय व नयनरम्य मनाला चिरशांती देणारे हे ठिकाण आहे. 250 फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात. जैनांची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुक्तागिरीला संपूर्ण देशभरातून श्रावक येतात. त्यांच्याकरिता संस्थानतर्फे निवासाची उत्तम व्यवस्था आहे. जेवणाकरिता जैनी मेस आहे. कार्तिकी पौर्णिमेला 52 शुभ्र मंदिरांच्या श्रृंखलेतील दहाव्या क्रमांकाच्या मंदिर व परिसरातील पहाडावर केशरचा पाऊस पडत असल्याची श्रद्धा आहे. करोडो मुनींना मोक्ष प्राप्त झालेल्या मुक्तिगिरीच्या 52 मंदिरांची वंदना करण्याकरिता 250 पायऱ्या चढाव्या लागतात, तर उतरते वेळी 350 उतराव्या लागतात. कार्तिकी पौर्णिमेला येथे रथोत्सव उत्साहात साजरा होतो व यात्राही भरवली जाते.

(प्रतिक्रिया)

गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार प्रवेश बंद होता. तो आदेश प्राप्त झाल्यानंतर श्रावक व पर्यटकांकरिता सुरू करण्यात आला. दिवसभरात एक हजारांवर पर्यटक येथे येतात. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून विनामास्क प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. रस्ता व मोबाइल रेंज याकडे शासनाने लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

-अतुल कळमकर, अध्यक्ष, श्री सिद्ध क्षेत्र मुक्तगिरी संस्थान

Web Title: Siddhakshetra Muktagiri is covered with green shalu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.