शिवशाहीत गुदमरतो जीव, लालपरीला ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 01:34 AM2019-05-11T01:34:25+5:302019-05-11T01:35:28+5:30
प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे. त्यांच्या वेळेचे नियोजन नाही. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
परतवाडा आगारातील चार शिवशाही बसपैकी दोन बसमध्ये वातानुकूलन यंत्रणा योग्य काम करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. बसमधील वातावरण थंड होत नाही. या हवाबंद बसमध्ये प्राणवायूची कमतरता जाणवते. बसमध्ये खिडक्या उघडण्याची तरतूद नाही. त्यातच बस पीकअप घेत नाही म्हणून एसी कमी ठेवण्याचे, बंद करण्याचे प्रकारही घडत आहेत.
परतवाडा आगारातून अमरावती, अकोला, धारणी, भुसावळ, चिखलदरा, नागपूरसह विदर्भात व विदर्भाबाहेर दररोज हजारो प्रवासी घेऊन फेरी करणाऱ्या एसटी बस ऊर्फ लालपरीची स्थिती दयनीय बनली आहे. काहींच्या खिडक्या व काच गायब आहेत. इंजिनची स्थिती अत्यंत वाईट आहे. अगदी भंगार स्थितीतील गाड्या डेपोतून पाठवल्या जात आहेत. परतवाडा-अमरावती मार्गावर दिवसाआड एक ते दोन बस रस्त्यात कुठे ना कुठे फेल पडत आहे. देखभाल व दुरूस्तीचे परिणामकारक नियोजन नसल्याने नादुरुस्त बसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
तासन्तास प्रतीक्षा
परतवाडा डेपोच्या व तेथून सुटणाºया अनेक बसची वेळ पाळली जात नाही. बस, प्रवासी आणि वेळ यांचा ताळमेळ, नियोजन नाही. एक तर एकामागोमाग बस एकाच वेळेस सुटतात. त्यामुळे कित्येक बसेस रिकाम्या जातात. या बस निघून गेल्यानंतर प्रवाशांना बसची तासन्तास वाट बघावी लागत आहे.
प्रवासी पळवले जातात
रिकाम्या बस डेपोबाहेर रस्त्यावर काढल्यानंतर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना खासगी वाहतूकदार स्वत:कडे आकर्षित करतात. याकरिता आपले वाहन अगदी बस स्थानकासमोर उभ्या राहील, अशी तजवीज करतात. एजन्टांना बस स्थानकात पाठवून या प्रवाशांना आणले जाते. एजन्ट अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत एसटी महामंडळाचे प्रवासी पळवून नेत असले तरी बस स्थानकातील कुणीही अधिकारी त्यांना आळा घालण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती बघायला मिळत आहे.