सिद्धार्थनगर झोपडपट्टी ते कोलंबिया; 'विकास'ने आपले नाव केले सार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 07:20 AM2022-01-09T07:20:00+5:302022-01-09T07:20:01+5:30
Amravati News वडील चहाटपरी चालवणारे व आई किराणाचे दुकान चालवते. आर्थिक स्थिती ठीक नसूनही विकासने पदव्युत्तर शिक्षण घेऊन थेट कोलंबियापर्यंत मजल मारली आहे.. अमरावतीमधील एका युवकाची गगनभरारी
गणेश वासनिक
अमरावती : घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून शिकू शकलो नाही, असे अनेकजण सांगतात. तो बहाणाच असल्याचे विकास तातड या तरुणाने दाखवून दिले. चहाची टपरी चालविणाऱ्या व्यक्तीच्या या मुलाने झोपडीत अभ्यास करून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला आहे. तो शिक्षणासोबतच ‘पार्टटाईम जॉब’देखील करणार आहे. त्यासाठी त्याला दरमहा दीड लाख पगार मिळेल. विकासच्या या भरारीमुळे त्याचे आई-वडील आणि मित्रमंडळी भारावून गेले आहेत.
विकासचे वडील कृष्णा तातड हे येथील दयासागर रुग्णालयाजवळ चहाची टपरी चालवितात, तर आई रेखा यांनी घरीच छोटेसे दुकान टाकून उदरनिर्वाहाचे साधन मिळविले. त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी कशीबशी तरतूद करीत गेले. जेथे दहावीनंतर शाळा सोडून दोन-चार पैसे हाती येण्यासाठी कष्टाची वाट धरली जाते, त्या परिसरात राहूनही विकासने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून बी.कॉम. झाल्यानंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याच दरम्यान त्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, असा निर्धार केला. मात्र, या शिक्षणासाठी त्याला सव्वा कोटी रुपये खर्च येत होता.
तीनदा नाकारला व्हिसा
महाराष्ट्र सरकारची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती विकासला मंजूर झाली. मात्र, व्हिसा काढताना या शिष्यवृत्तीशिवाय खात्यात किती पैसे आहेत, अशी विचारणा झाली. खात्यात पैसे नसल्याने बँक कर्ज द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे तब्बल तीनवेळ व्हिसा नाकारला गेला. अखेर चौथ्यांदा समाजातील काही नागरिकांनी त्याला ३० ते ४० लाख रुपयांची मदत केली आणि व्हिसाची प्रक्रिया पुढे सरकली. एम.ए. ‘कम्पॅरिटिव्ह इन इंटरनॅशनल एज्युकेशन’ या विषयाच्या शिक्षणासाठी विकासचे विमान १३ जानेवारीला नागपूर विमानतळाहून उड्डाण घेणार आहे.
भविष्यात देशातील जातीव्यवस्था कमी व्हावी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील भेदाभेद नष्ट करायचे आहे. लहान-मोठ्या शाळांमध्ये प्रचलित अभ्यासक्रमांऐवजी बदलत्या काळानुसार शिक्षण प्रणालीसाठी संशोधन करण्याचे मानस आहे.
- विकास तातड, अमरावती.
आई-वडील समाधानी
मुलाच्या या गगनभरारीने त्याच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला आहे. त्याने आणखी होतकरू विद्यार्थ्यांना तेथे घेऊन जावे व त्यांना मदत करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पाय जमिनीवरच
अमेरिकेची तयारी झाली असली तरी विकास आजही वडिलांना त्यांच्या चहा टपरीवर मदत करीत असतो. त्याची बहीण त्याच्याच मार्गाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे. धाकटा भाऊ विपिन हा रॅप गायक आहे. मित्रांनाही त्याच्या या भरारीचा अभिमान आहे.