खासगी बोअरद्वारे शहराच्या भूगर्भाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:39+5:302021-07-14T04:15:39+5:30
अमरावती : घरोघरी असलेल्या बोअरद्वारे भूजलाचा वारेमाप उपसा होत असताना शहरात किती अधिकृत व अनधिकृत बोअर आहेत, याची ...
अमरावती : घरोघरी असलेल्या बोअरद्वारे भूजलाचा वारेमाप उपसा होत असताना शहरात किती अधिकृत व अनधिकृत बोअर आहेत, याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही. याशिवाय महापालिका कार्यक्षेत्रातील भूजलाची नोंद ‘जीएसडीए’द्वारा घेतली जात नसल्याची माहिती आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी दिली.
शहरातील भूजलाच्या नोंदी असणे महत्त्वाचे असल्याने भूजल सर्व्हेक्षण विभागाद्वारा शहरातल्या नोंदी देखील घ्यायला पाहिजे, यासंदर्भात आपण पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात काँक्रीट व डांबरीकरणाचे रस्ते असल्यामुळे शहराचा भूजलस्तर खालावत आहे. दोन वर्षांपूर्वी शहराचा भूजलस्तर खालावत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त संजय निपाणे यांनी शहरातील वडाळी तलावाचा गाळ लोकसहभागातून काढण्याची मोहीम राबविली होती. याशिवाय महापालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांकडे ‘रेन वॉटर हार्वस्टिंग’ असणे अनिवार्य केले व मोहिमेची सुरुवात स्वत:च्या निवासस्थानापासून केली होती. याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘रेन वॉटर हार्वस्टिंग’असण्याबाबत पत्र देण्यात आले होते. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यालयांनी ही सिस्टिम लावली होती. त्याचप्रमाणे शहरात निर्मानस्त काँक्रीट रस्त्याच्या कामात भूजल पुनर्भरणाची सक्ती कंत्राटदाराला करण्यात आली होती. त्यामुळे शहराच्या भूजलस्तरात किती सुधारणा झाली, हे पाहण्यासाठी शहरातील भूजलाच्या नोंदी असणे महत्त्वाच्या ठरणार आहे.
बॉक्स
वाॅटर प्लांटधारकांना ‘रेन वॉटर हार्वस्टिंग’ची सक्ती
शहरात किमान ८० ते १०० थंड पाण्याचे कॅन विक्रेते आहे. त्यांच्याकडे प्लॉटसाठी बोअरद्वारा भूजलाचा उपसा केला जातो. त्यामुळे भूजल पुनर्भरणाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे या प्लॉटधारकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले होते व अनेकांचे प्लॉट सील करण्यात आले होते. आता दोन वर्षांपासून ही मोहीम ठप्प असल्याचे दिसून येते.
बॉक्स
खासगी बोअरद्वारे अमर्याद भूजल उपसा
शहरातील बहुतेक घरी नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होत असताना बोअरदेखील आहे. शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होत असल्याने घरोघरी बोअर करण्यात आल्या आहेत व याद्वारे भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. शहरात किती बोअर आहेत याची कुठलीही माहिती प्रशासनाकडे नाही व याबाबत कुठलेही निर्बंध नसल्याने भूजलाचा अमर्याद उपसा होत असल्याचे वास्तव आहे.
कोट
महापालिका क्षेत्रातील भूजलाच्या नोंदी ‘जीएसडीए’कडे नाहीत. त्यांनी घ्यायला पाहिजे यासाठी पत्र देणार आहोत.
- प्रशांत रोडे,
आयुक्त, महापालिका
कोट
‘जीएसडीए’द्वारा तालुकास्तरावरील भूजलाच्या नोंदी घेतल्या जातात . महापालिका क्षेत्रातील नोंदी घेतल्या जात नाहीत.
उल्हास बंड
भूवैज्ञानिक, जीएसडीए