बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कलेक्टोरेटमध्ये स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:29 AM2019-06-14T01:29:59+5:302019-06-14T01:30:26+5:30
जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातर्फे जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान व चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी, प्रकल्पातील स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्ररथावरील संदेशफलकावर बालमजुरीविरोधी संदेश लिहून स्वाक्षरी केली. सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनीही संदेशलेखन व स्वाक्षरी केली.
यावेळी बालमजुरीविरोधी पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून हे अभियान बसस्थानक चौक, राजापेठ चौक, गांधी चौक व पंचवटी चौकातून विविध भागांत राबविण्यात आले. ठिकठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. काशिराम चाळ, सुफी प्लॉट, रायपुरा, मोमिनपुरा, विलायतपुरा, बियाबानी, सिंधी कँप, आनंदनगर, अलीमनगर, औरंगपुरा, लालखडी, अजिजपुरा आदी विविध ठिकाणांहून स्वयंसेवक जमले होते. नागरिकांनीही या स्वाक्षरी अभियानाला मोठा प्रतिसाद दिला.