शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:18 AM2018-04-20T01:18:03+5:302018-04-20T01:18:03+5:30
शहराला आवश्यक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या पाठपुराव्यासाठी १ लाख स्वाक्षरींची मोहीम छेडण्यात येणार आहे. याद्वारे शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती आयएमए हॉलमध्ये बुधवारी आयोजित बैठकीत तज्ज्ञांची दिली.
अमरावती : शहराला आवश्यक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या पाठपुराव्यासाठी १ लाख स्वाक्षरींची मोहीम छेडण्यात येणार आहे. याद्वारे शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती आयएमए हॉलमध्ये बुधवारी आयोजित बैठकीत तज्ज्ञांची दिली. या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ स्थानिक बाजार समितीमधून २० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजक एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर होते. जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी, ऋषीकेश नागलकर, डॉ. जयंत पांढरीकर, बबन बेलसरे, मिसाळ, हरिना नेत्रदान समितीचे मनोज राठी, शरद कासट, मधुसूदन उमीकर, लता देशमुख, व्यापारी आत्माराम पुरसवानी, दीपक दादलानी, धीरज बारबुद्धे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती.
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. अमरावती विभागातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २४० प्रवेशांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ते आवश्यकही आहे. यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक लक्ष नागरिकांच्या स्वाक्षºया घेऊन ते निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी जागेची पाहणी केली असून, लवकरच १०० एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे किरण पातूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या तज्ज्ञांसमोर चर्चा
काही दिवसांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात किरण पातूरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता प्रतिपादित केली. त्यांच्यानुसार, नागपूर विभागात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५५० जागा आहेत, तर अमरावती विभागात ३१० जागा आहेत. नागपूर विभागाच्या तुलनेत २४० जागांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अंबानगरीत असे महाविद्यालय गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात २५० कोटींचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी तयार करून तो पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर ४०० खाटांच्या इमारतीसाठी १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला जाईल.