स्थायीच्या सभापती पदासाठी स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: January 17, 2016 12:13 AM2016-01-17T00:13:47+5:302016-01-17T00:13:47+5:30
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस पक्षातील मुस्लीम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली.
अमरावती : महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस पक्षातील मुस्लीम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. सभापतिपद हे मुस्लिम नगरसेवकाला मिळावे, यासाठी माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्यावर दबावतंत्राची राजकीय खेळी चालविल्याचे चित्र आहे.
या सत्रातील स्थायी समिती सभापतिपद हे शेवटचे राहणार आहे. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी फ्रंट यांच्यात मैत्री असून सभापतीपद हे सहजतेने काबीज करता येणार आहे. मात्र स्थायी समितीत सदस्यपदाची नियुक्ती होण्यापीर्वीच सभापती पदासाठी लॉबिंग सुरू आहे. काँग्रेस गटातच स्थायीचे सभापतीपद मिळावे, यासाठी मुस्लिम नगरसेवकांनी माहोल तयार करण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेत मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी फ्रंट या गटाशी जुळलेले आहे. काँग्रेसने सलग दोन वेळा सुगनंचद गुप्ता, विलास इंगाले यांच्या रुपात सभापतीपद मिळविले आहे. सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला तर यावे, पण ते ही मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला मिळावे, यासाठी काही दिवसांपूर्वी माजी आ.रावसाहेब शेखावत यांची मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुस्लिम समाजाच्या एकुणच नगरसेवकांनी माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्या पुढ्यात भविष्याचे राजकारण विशद केले. स्थायी समितीचे सभापतीपद हे मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला देणे कसे योग्य राहील, हे उदाहरणानिशी पटवून सांगितले. मात्र सभापतीपद कोणाला द्यावे? हे मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी आपसात ठरवून ते नाव निश्चित करण्याचा मध्यम मार्ग रावसाहेब शेखावत यांनी काढला. त्यानुसार महापालिकेत सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. काँग्रेसमधून आसीफ तवक्कल हे नाव स्थायी समिती सभापती पदासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांच्या दालनात बैठकांचे सत्रदेखील सुरू झाले आहे. मात्र सभापती पदासाठी राष्ट्रवादी फ्रंट गटाला विश्वासात घेतल्याशिवाय काँग्रेसला ते मिळविणे शक्य नसल्याचे बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)