‘तखतमल’च्या मालकावर फौजदारी कारवाईचे संकेत
By admin | Published: June 16, 2015 12:23 AM2015-06-16T00:23:50+5:302015-06-16T00:23:50+5:30
स्थानिक जयस्तंभ चौक नजीकच्या तखतमल इस्टेट नामक कापडविक्रीच्या संकुलातील रस्त्याची जागा हडप करुन त्या
रस्त्यावर अतिक्रमण : ओट्यांच्या जागेचा दुकानांसाठी वापर
अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौक नजीकच्या तखतमल इस्टेट नामक कापडविक्रीच्या संकुलातील रस्त्याची जागा हडप करुन त्या जागेचा वाणिज्य वापर केल्याप्रकरणी संबंधित संकुलाच्या मालकावर फौजदारीे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी या संकुलाचे मोजमाप करुन कागदपत्रे तपासण्यात आलीत. त्यात बहुतांश दुकानदारांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या मार्गदर्शनात तखतमल संकुलातील दुकानांचे मोजमाप करण्यात आले. यामध्ये दुकानदारांनी ओट्यांची जागा काबीज करुन त्यावर कापडविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. इतकेच नव्हे तर संकुलात रस्त्यावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. तखतमल संकुल हे सारंग चांडक यांच्यासह दोन जणांच्या नावे आहे. या संकुलात कापडविक्री केली जाते. परंतु अनेक दुकानदारांनी ओट्यांची जागा ताब्यात घेत त्यावर शटर बसवून दुकाने थाटली आहेत. हा नियमबाह्य प्रकार अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निदर्शनास आला आहे. संकुलात ॅयेणाऱ्या ग्राहकांना वाहने कोठे उभी करावी, हा प्रश्न कायम पडतो.
आयुक्तांशी चर्चेअंती कारवाई
तखतमल इस्टेट या कापड संकुलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्याची जागा हडप करण्यात आली असून ओट्यावर दुकाने थाटली आहेत. याबाबत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी चर्चा झाल्यावरच संकुलाच्या मालकावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.