वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:09+5:302021-06-25T04:11:09+5:30

समाजकल्याण; शाळा, महाविद्यालये बंदचा परिणाम अमरावती : राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभाग ...

Signs of delay in hostel admission process! | वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे !

वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे !

Next

समाजकल्याण; शाळा, महाविद्यालये बंदचा परिणाम

अमरावती : राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभाग (समाज कल्याण) मार्फत चालणाऱ्या मागासवर्गीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सलग दुसऱ्या वर्षी रखडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा सामाजिक व न्याय विभागामार्फत जिल्ह्यात २४ शासकीय वसतिगृहे चालविण्यात येतात. मुला, मुलींसाठीची ही वसतिगृहे जिल्हा मुख्यालयासह विविध तालुक्यांच्या ठिकाणी सुरू आहेत. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. वसतिगृहात अनुसूचित जाती, जमाती, विमुक़्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, अनाथ व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वसतिगृहातच ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातात. अर्ज स्वीकारल्यानंतर गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सामाजिक न्याय विभागामार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जेवण व राहण्याची व्यवस्था केली जाते तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विभागामार्फत रोख रक्कम दिली जाते. यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक कल असतो. मात्र, यावर्षी सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली तरच या वसतिगृहात नवीन वर्षात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची नवीन प्रवेश प्रक्रिया रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

अशी राबविली जाते प्रक्रिया

वसतिगृहात सातवी उत्तीर्ण झाल्यावर आठवीच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था असते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होते. हे विद्यार्थी बारावीपर्यंत वसतिगृहात राहतात. बारावी पास झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी अर्ज करू शकतात.या विद्यार्थ्यांची निवड ही मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड जोडावे लागते. हे अर्ज केलेल्या यादीमधून प्रचलित नियमांप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्ग आणि रिक्त जागा खास बाब यांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

बॉक्स

Web Title: Signs of delay in hostel admission process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.