मेळघाटातील जंगलात स्मशानशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:47+5:302021-03-27T04:13:47+5:30
परतवाडा : ज्या महिला अधिकाऱ्याचा कालपर्यंत तस्करांवर दरारा राहिल्याने शिकाऱ्यांची भीती मनात न बाळगता जंगलातील पशू-पक्षीही किलबिल करीत ...
परतवाडा : ज्या महिला अधिकाऱ्याचा कालपर्यंत तस्करांवर दरारा राहिल्याने शिकाऱ्यांची भीती मनात न बाळगता जंगलातील पशू-पक्षीही किलबिल करीत मुक्तकंठाने हवेत भरारी घेत होते. देशातील एकमेव डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसाल गावापासून सर्वत्र ज्या नावाची चर्चा होती, त्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने शुक्रवारीसुद्धा मेळघाटात स्मशानशांतता दिसून आली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत हरिसाल परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी छातीवर बुंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे सर्व आदिवासी पाड्यांमध्ये निरव शांतता पसरली आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर कठोर कारवाई करावी, त्याला पाठीशी घालणाऱ्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कारवाईची ही मागणी सर्व स्तरातून होत आहे. जंगलातील लागलेल्या आगीप्रमाणे हा भडका वनकर्मचाऱ्यांचा मनात उडाला आहे.
बॉक्स
महिलांची बाजू ऐकणार कोण?
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांची बाजू ऐकण्यासाठी वरिष्ठ अधिकारी असतात. मात्र, वनविभागातील मुख्य पदावर असलेल्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दीपाली चव्हाण यांच्यावर वारंवार होणाऱ्या छळाची दखल घेतली नाही. एक होतकरू तरुणी, कणखर अधिकारी लेडी सिंघम आणि मेळघाटची वाघीण असे नामकरण असताना तिला आत्महत्येस प्रवृत्त केले गेले. या प्रकरणामुळे मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांचे अधिकारी काहीच ऐकत नसल्याचे पुढे आले आहे.
बॉक्स
शिवकुमार वादग्रस्तच
नावाने शिवकुमार असले तरी लहान-मोठे दुकान किंवा वनकर्मचाऱ्यांना विनाकारण छळणारा, सतत शिवीगाळ करणारा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार सतत वादग्रस्त ठरला आहे. परतवाडा येथील एका अपंग कर्मचाऱ्याला त्याने मारहाण केली होती. ते प्रकरण पोलिसांतसुद्धा गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा त्याचा हा प्रकार वाढतच गेला. वरिष्ठांनी वेळीच दखल न घेतल्याने एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला जीवाला मुकावे लागल्याची प्रतिक्रिया वनकर्मचाऱ्यांनी दिली.