अमरावतीच्या आरटीओत सन्नाटा, ‘तो’ दलाल पसार, तीन अधिकारी अटकेत
By गणेश वासनिक | Published: May 3, 2024 10:07 PM2024-05-03T22:07:40+5:302024-05-03T22:08:18+5:30
चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरण, १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती
अमरावती : चाेरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी येथील आरटीओच्या गुडबुकमध्ये असलेला ‘तो’ दलाल पसार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमरावती येथील तीन आरटीओंच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी अटक केली आहे. आतापर्यंत अमरावती आरटीओत १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणाशी निगडीत आठ वाहनांचे थेट कनेक्शन असलेला दलाल याचा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.
अरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली आणि हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा गोरखधंदा सुरू होता. विशेष दलालांमार्फत चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करताना ते ट्रक अमरावती आरटीओत प्रत्यक्षात कधीच हजर राहत नव्हते. मात्र, ॲपवर ऑनलाइन नोंदणी दर्शविली जात होती. त्यामुळे ‘त्या’ दलालांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना ‘जी फॉर्म’ म्हटले की, डोळेझाक करून हे चोरीचे वाहन नोंदणी केले जात होते. यात आरटीओतील कार्यालयीन कर्मचारी ते आरटीओ अधिकारी अशी साखळी असल्याची माहिती आहे.
...असे उघड झाले अमरावती, नागपूर आरटीओ कनेक्शन
नवी मुंबई गुन्हे शाखेने ४ मार्च २०२४ रोजी मुंबई येथील ट्रक टर्मिनल परिसरात धाडसत्र राबविले. येेथे संशयास्पद ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम १५६७ आणि एमएच ४० सीएम ३०९८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनांचे चेसीस, इंजीन क्रमांकाची तपासणी केली असता या वाहनांचे मालक कमलेश गोपाल मंगे व नीरव ठक्कर हे असल्याचे पुढे आले. त्यामुळे या दोघांनाही मुंबई येथील बेलापूर पोलिस ठाण्यात चाैकशीसाठी बोलावले असता ही वाहने सचिन नवघणे आणि जावेद मणीयार यांना विकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी टाटा कंपनीच्या तज्ञ्जांकडून या वाहनांची तपासणी केली. ही वाहने बाहेरून टाटा कंपनीची असली तरी या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करण्यात आली, असा धक्कादायक अभिप्राय टाटा कंपनीच्या तज्ञ्जांनी दिला. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर ही वाहने अमरावती, नागपूर आरटीओत नोंदणी झाल्याचे उघडकीस आणले. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहा सदस्यीय पथक २४ एप्रिल रोजी नागपूर आरटीओत चौकशीसाठी आल्याची माहिती आहे.
मुंबईत बयानासाठी बोलावले, आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटक
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी नागपूर येथील आरटीओ कार्यालयात १७ एप्रिल रोजी आले होते. याप्रकरणाशी संबंधित अमरावती येथील आरटीओ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी बयाण नोंदविण्यासाठी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरूठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके यांना बोलावले असता तिघांंनाही मुंबईत अटक केली.