रात्री १२.२० वाजता गाडगेबाबांना मौन श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:51+5:302020-12-22T04:12:51+5:30
(दोन फोटो आहेत.) अमरावती : गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरात रविवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मोजक्या अनुयायांच्या उपस्थितीत ...
(दोन फोटो आहेत.)
अमरावती : गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरात रविवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मोजक्या अनुयायांच्या उपस्थितीत गाडगेबाबांना मुख्य सोहळ्यात एक मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समाधीच्या दिशेने फुलांचा वर्षाव करून ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’चा गजर करण्यात आला. प्रथमच हा सोहळा ‘फेसबूक लाईव्ह’ करण्यात आला. याद्वारे घरोघरीदेखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गाडगेबाबांच्या ६४ व्या पुण्यतिथी महोत्सवाची मौन श्रद्धांजलीने सांगता झाली. प्रारंभी हभप भरत रेळे, अतुल रेळे यांनी गाडगेबाबांच्या जीवनचरित्रावर संगीतमय कार्यक्रम सादर केला. ११ वाजून ४५ मिनिटांनी संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी २० डिसेंबर १९५६ रोजीच्या गाडगेबाबांच्या अखेरच्या क्षणांचे विवेचन केले. १२.२० मिनिटांनी एक मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबांच्या आवडत्या ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हे भजन म्हणून ‘गोपाला गोपाला’चा गजर करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक अनुयायांची उपस्थिती यावेळी होती. सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत त्यांनी भजनात सहभाग नोंदविला. मौन श्रद्धांजलीनंतर समाधीचे दर्शन घेऊन ते परतले.
पुण्यतिथी महोत्सवादरम्यान मंदिरात करण्यात आलेले रोषणाई विशेष आकर्षण ठरली होती. नागरवाडी येथील सतीश टाले यांनी ‘श्री गाडगेबाबा समाधी मंदिर स्थळ, अमरावती’ या नावाने फेसबूक अकाऊंट तयार करून मुख्य सोहळा ‘लाईव्ह’ केला. सोमवारी सकाळी पार पडणारी शोभायात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी दिली.