अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंतांना लाखो अनुयायांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:27 PM2019-10-19T19:27:45+5:302019-10-19T19:30:10+5:30
खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली.
अमित कांडलकर/सूरज दहाट
अमरावती : खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली. ४ वाजून ४८ मिनिटांनी येथे उपस्थित लाखोंचा जनसागर याप्रसंगी स्तब्ध झाला होता.
विधानसभा निवडणुकीतील राजकीय प्रचार व ढगाळ वातावरणाची पर्वा न करता आपल्या गुरुमाउलीला मौनश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेवभक्त व साधकांनी राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली. वेळोवेळी अतिरेकी हल्ल्यात भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मौन श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम शनिवारी दुपारी ३.३० वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा’ या प्रार्थनागीताने आरंभ झाला. तीन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांचा विश्वात्मक विचार व त्यांच्या कार्याचा त्यातून मिळणाच्या ऊर्जेचा, दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. ठीक ४.५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने सर्व गुरुदेवभक्तांनी, साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. योगगुरू रामदेवबाबा यांनी पुण्यतिथी महोत्सवातील मुख्य सोहळ्याला हजेरी लावली.
‘मै मानव जीवन की सुसाधना का कर्मयोग हूँ। मैं इस संसार को विश्वशांती का मार्गदाता हूँ’ हे भजन गाऊन व ‘राष्ट्रसंता जगत् गुरु कृपावंता’ ही आरती करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूकडून करण्यात येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोथे यांनी केले. गोपाल सालोडकर, किशोर अगडे, शीतल मांडवगडे, नीलेश इंगळे, रवि खंडारे, हरीश लांडगे, रामेश्वर काळे, प्रशांत ठाकरे, स्वप्निल बोबडे, यश यावले, शीतल बुरघाटे, जया सोनारे, शीतल तायडे, रश्मी भाटी, धनश्री खारोडे, स्वप्निल सरकटे, अरविंद गेडाम, प्रवीण काळे, घनश्याम काटकर यांनी विविध वाद्यांची व गायनाची साथसंगत केली.
गुरुदेवभक्तांचा सोहळा
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे अश्विन वद्य पंचमीला शुक्रवार, ११ ऑक्टोबर १९६८ रोजी सायंकाळी ४.५८ मिनिटांनी महानिर्वाण झाले होते. तेव्हापासून त्यांच्या विचाराचे सर्वधर्म पथातील भक्त व साधक या दिवशी श्रीक्षेत्र गुरुकुज आश्रमात एकत्र येऊन गुरुमाउलीला श्रद्धांजली अर्पण करतात. ५० वर्षांपासून श्रद्धांजलीचा सोहळा अविरतपणे होत आहे.
नीरव शांतता
मौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थबकली. दुकानातील व्यवहार व भोंगे बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र नीरव शांतता होती. मुख्य मंडपातील शिस्त श्रीगुरुदेव विद्यामंदिर मानवसेवा छात्रालय, समता वसतिगृह यातील विद्यार्थी व शिक्षकांनी चोखपणे सांभाळली. पोलीस विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानासुद्धा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात बंदोबस्त ठेवून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली.
पुढच्या वर्षी येणार - रामदेवबाबा
राष्ट्रसंतांच्या भूमीवर येऊन महाराजांचे दर्शन झाले. यापुढे मी याठिकाणी नेहमीच येत राहणार. पुढच्या वर्षी मी तीन दिवस या ठिकाणी गुरुदेवभक्तांना योग शिकवेन. महाराजांची दूरदृष्टी अफाट आहे. म्हणूनच त्यांनी मानवता हा एकमेव धर्म सर्वांनी प्रामाणिकपणे जोपासावा, असे रामदेवबाबा याप्रसंगी म्हणाले. यावेळी रामदेव बाबा यांनी राजस्थानी भजन गायिले.