नियमांची ऐसीतैसी; अतिउत्साही पर्यटक पोहोचले भीमकुंड धबधब्याजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 09:01 PM2023-07-13T21:01:57+5:302023-07-14T15:38:19+5:30
Amravati News विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर महाभारतकालीन भीमकुंड पॉईंटच्या ३५०० फूट खोल धबधब्यानजीक गुरुवारी सायंकाळी तीन पर्यटक गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
नरेंद्र जावरे
अमरावती : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर महाभारतकालीन भीमकुंड पॉईंटच्या ३५०० फूट खोल धबधब्यानजीक गुरुवारी सायंकाळी तीन पर्यटक गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. जिवाचा धोका असल्याने प्रवेश निषिद्ध असलेल्या अशा ठिकाणी जीवघेणे साहस करणाऱ्यांना आवरणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळावर पावसाळ्याच्या दिवसांत हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. अशात शेकडो फूट उंचावरून कोसळणाऱ्या भीमकुंडाच्या मुखाशी तीन पर्यटक पोहोचले. जिवाची कुठलीच पर्वा किंवा भीती बाळगण्याऐवजी ते तेथून हातवारे करीत होते. हा सर्व प्रकार भीमकुंडाच्या कठड्याशी असलेल्या पर्यटकांनी पाहताच आवाज लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. दरम्यान, या पर्यटनस्थळावरील पॉइंटवर विशिष्ट मर्यादेपलीकडे प्रवेश निषिद्ध असताना ते तेथे गेले कसे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
अनेकांनी गमावला जीव
चिखलदरा पर्यटनस्थळावरील भीमकुंड पॉईंटच्या दरीत काहींनी उडी घेत जीवन संपविलेे, तर काहींचा अपघाताने पाय घसरून जीव गेल्याचा प्रकार नवीन नाही. त्यामुळे वनविभागाच्या वतीने येथे प्रवेश निषेधाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु, पर्यटक नियम मोडून जात असल्याचे गुरुवारी पुन्हा उघड झाले.
पोलिस, वनाधिकाऱ्यांची गस्त
मेळघाट वन्यजीव विभागाने हा संपूर्ण घटनाक्रम गांभीर्याने घेतला आहे. दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटवर गस्त लावण्यात आली तसेच पोलिसांनासुद्धा तशा सूचना देत कारवाई केली जाणार असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी यशवंत बहाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भीमकुंड येथील प्रकारासंदर्भात व्हिडीओ पाहिला. दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गस्त लावण्यात आली असून, पोलिसांनाही असा प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- यशवंत बहाडे, विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा