सप्टेंबर महिन्यात एकाच वेळी चार ग्रहांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:47+5:302021-09-05T04:16:47+5:30
अमरावती : सप्टेंबर महिन्यात सूर्यमालेतील चार प्रमुख ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी एकत्र पाहण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमींना मिळली आहे. बुध, शुक्र, ...
अमरावती : सप्टेंबर महिन्यात सूर्यमालेतील चार प्रमुख ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी एकत्र पाहण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमींना मिळली आहे. बुध, शुक्र, गुरू व शनी हे ग्रह रात्रीच्या अंधारात अवकाशात तेजोमय दर्शन देत आहेत.
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर दिसतो. ९ सप्टेंबर रोजी हा ग्रह चंद्राच्या अगदी खाली दिसेल. शुक्र हा ग्रह सायंकाळी सूर्यास्तानंतर रात्री ८.३० पर्यंत पश्चिम दिशेला दिसतो. हा ग्रह खूप चमकत असल्याने सहज ओळखता येईल. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू सायंकाळी पूर्व दिशेला दिसत आहे. हा ग्रह रात्रभर आकाशात दिसतो व पहाटे पश्चिमेकडे मावळतो. या ग्रहाचे चंद्र व ग्रेट रेड स्पॉट पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता आहे. या ग्रहाला एकूण ७९ चंद्र आहे. त्यापैकी यूरोपा, गॅगीमिड, आयो व कॅलोस्टो हे चार चंद्र टेलिस्कोपमधून दिसू शकतात. सूर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह शनी हा सायंकाळी पूर्वेकडे गुुरुच्या बाजूला दिसतो. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसतो. अगदी साध्या डोळ्यांनी हा पाहता येईल. परंतु, या ग्रहाची सुप्रसिद्ध रिंग पाहण्याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे. या ग्रहाला एकूण ८२ चंद्र आहे. हे सर्व चारही ग्रह खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावे, असे आवाहन विजय गिरूळकर यांनी केले आहे.