लसीकरण केंद्रावर खाकीतील महिलेचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:47+5:302021-06-28T04:09:47+5:30
फोटो पी २७ चांदूररेल्वे चांदूर रेल्वे : एरव्ही समाजात पोलीस किंवा होमगार्ड आपला मित्र आहे. यापेक्षा त्यांची भीतीच नागरिकांमध्ये ...
फोटो पी २७ चांदूररेल्वे
चांदूर रेल्वे : एरव्ही समाजात पोलीस किंवा होमगार्ड आपला मित्र आहे. यापेक्षा त्यांची भीतीच नागरिकांमध्ये अधिक दिसून येते. शहाण्या माणसाने पोलीस ठाण्याची पायरी चढून नये वगैरे… असा समज जनसामान्यात पाहायला मिळतो. मात्र, अनेकवेळा खाकीतील काही कर्मचारी या प्रतिमेला तडे देत माणुसकीचे दर्शन घडवितात. खाकीतील माणुसकीचा असाच एक अनुभव चांदूर रेल्वे शहरातील लसीकरण केंद्रावर शनिवारी पहावयास मिळाला. लसीकरण केंद्रावर ५ हजार ७२० रुपयांची रक्कम असलेली पर्स खाली पडलेली एका महिला होमगार्डच्या निदर्शनास आली. त्यांनी संबंधित वृध्द महिलेचा शोध घेतला आणि रोकड असलेली पर्स परत करून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले.
अमरावती शहरातील सुयोग कॉलनी येथील वृध्द महिला निर्मला देविदास मोहोड (६८) ह्या चांदूर रेल्वे येथे त्यांची मुलगी लता क्षीरसागर यांच्याकडे मागील २ महिन्यांपासून राहत आहे. अशातच त्या चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषद नेहरू शाळेतील लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यास आल्या होत्या. यादरम्यान त्यांची पैसे असलेली पर्स खाली पडली. मात्र, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही व त्या लस घेऊन निघून गेल्या. खाली पडलेली पर्स होमगार्ड वर्षा पाटील यांना दिसली. त्यांनी ही माहिती सोबत ड्युटीवर असलेले होमगार्ड पंकज गोगटे, आशिष गहुकार यांना दिली. त्यानंतर होमगार्ड समक्ष लसीकरण केंद्रावर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्स उघडली असता, त्यात ५,७२० रुपये रोख दिसून आली. मात्र, नेमकी पर्स कुणाची, असा प्रश्न त्यांना पडला असताना त्यात एक मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी दिसून आली. त्यावरून संपर्क साधून सदर माहिती संबंधित व्यक्तीला देण्यात आली. यानंतर निर्मला मोहोड या तेथे पोहचल्या. ही पर्स त्यांची असल्याचे सांगतिले. यावेळी लसीकरण केंद्रावर नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रावीण्य देशमुख, चेतन भोले, अर्पित देशमुख, संजय कर्से, उमेश वाडेकर, अर्पित चौधरी, डॉ. मुदस्सीर यांच्या उपस्थितीत ती पर्स रकमेसह महिलेच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी सदर महिलेने होमगार्डसह सर्वांचे आभार मानले.
===Photopath===
270621\img-20210627-wa0001.jpg
===Caption===
photo